नगर- मनमाड रस्त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. म्हणूनच आंदोलन…

Ahmednagarlive24
Published:

नगर- मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर- मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्या वतीने ३ डिसेंबरला वर्षश्राद्ध आंदोलन होणार असल्याचे निवेदन राहुरीचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. याच विषयावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका व्हाटसअॅप ग्रुपवर विरोध केल्याचे दिसत आहे.

भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की नगर- मनमाड रस्त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. म्हणूनच आंदोलन करण्यात येत आहे. लांबे हे सत्ताधारी पक्षातील असूनदेखील आंदोलन करून विरोधकांना सहकार्य करत आहेत.

लांबे हे राहुरी शहरातील समस्यांवर बोलत नाहीत, याचा अर्थ राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे समर्थन करतात, असा आरोप केला जात आहे. भाजपाचे खासदार सुजय विखे यांनाच अप्रत्यक्षपणे या आंदोलनामुळे फटका बसू शकतो, अशी भीती भाजपच्या कार्यकत्यांना वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला रस्ता दुरुस्त कृती समितीचे सदस्य व विद्यमान शिवसेना (शिंदे गट) प्रमुख देवेंद्र लांबे हे २०१९ पासून रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून वसंत कदम यांच्या सोबत आंदोलनात सक्रीय आहेत. शिवसेना पक्षात प्रवेश करून देवेंद्र लांबे यांना ११ महिने झाले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राजकारणात येण्या अगोदरपासून रस्ता आंदोलनात सहभाग नोंदविलेला आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात नसून ज्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केला व रस्त्यावर ज्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला त्याला जबाबदार म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांचे डोक ठिकाणावर आणण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात वर्षश्राद्ध आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

सत्तेत असून शासकीय अधिकारी काम करत नसतील किंवा ऐकत नसतील, तर आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही. गेल्या ३ डिसेंबर २०२२ रोजी रस्ता कृती समितीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात दहावा घालण्यात आला होता, त्यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये नव्याने काम सुरु केले जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु आतापर्यंत रस्त्याचे काम चालू न केल्यामुळे वर्षश्राद्ध आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

राहुरी शहरातील समस्यांवरून लांबे म्हणाले, राहुरी शहरातील रस्त्यांचे प्रश्न, निकृष्ठ कामे, रस्ता दुभाजकांच्या विषयात नेहमीच विरोध करण्यात आलेला आहे. ज्या विषयात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो त्या विषयात आम्ही आवाज उठवतोच. शिर्डी नगर रस्त्यासाठी राजकारण न करता प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe