Maharashtra News : केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयही ५८ ऐवजी ६० वर्षे करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली आहे. हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचेही शिंदे यांनी म्हटल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी शिंदेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली.

त्यात सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याप्रमाणेच निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती शिंदेंनी दिल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.
जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी महासंघाने १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व संघटनांची बैठक बोलावली.
त्यात त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. बैठकीतील चर्चेनंतर शिंदेंनी आश्वासन दिल्याची माहिती महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली.