Breaking : व्याजाची मुद्दल ५० लाख व त्याचे व्याज वसूल करण्यासाठी हैद्राबाद येथील सावकारांनी राहुरी येथील इसमाला उचलून नेले आणि मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की निसार हसन पठाण (वय ४० वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे राहातात.
ते प्लॉटींगचा व्यवसाय करतात. त्यांची आरोपींबरोबर ओळख झाली. त्यानंतर आरोपी फैजानी चिस्ती यास शिर्डी येथे प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी त्यास शिर्डी येथे प्लॉट दाखवला. काही कारणांमुळे त्याने प्लॉट घेतला नाही.
त्यानंतर पठाण यांनी तीन वर्षापूर्वी चिस्ती यांच्याकडून ५० लाख रुपये ३ टक्के व्याजाने घेतले. पठाण यांनी वेळोवेळी चिस्ती याला मुद्दल व व्याज देऊन आतापर्यंत ४५ लाख रुपये दिले.
दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पठाण हे त्यांच्या घरी असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन बळजबरीने गाडीत बसवले. त्यांच्या आई व पत्नी त्यांना सोडविण्यासाठी मध्ये आले, तेव्हा आरोपी म्हणाले की, “तुमच्या मुलाने आम्हाला खूप त्रास दिला. तो जोपर्यंत आमचे पैसे देत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही. ”
आरोपींनी पठाण यांना शिर्डी येथे नेले. मध्ये राहाता ते शिर्डीदरम्यान गाडी थांबवुन पठाण यांना मारहाण केली. त्यानंतर पठाण यांना शिर्डी येथील रेड्डी नावाच्या हॉटेलबाहेर एका कॅन्टीनमध्ये नेऊन ‘आम्हाला आमचे पैसे परत दे, नाहीतर आम्ही तुला खोट्या केसमध्ये गुंतवून टाकू, अशी धमकी दिली.
पठाण यांनी आरोपींना विनंती करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. तेव्हापासून आरोपी पठाण यांना फोन करुन संपवून टाकण्याची धमकी देत आहेत. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पठाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून आरोपी फैजान अहमद चिस्ती (रा. प्रधान नामपल्ली, हैद्राबाद) व माजीद सोहेलभाई मैसुरी (रा. इराकुंडा रोड पेट्रोल पंप, आर आर जिल्हा, हैद्राबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.