Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित केला असून, पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार चालू आहे. पिण्यासाठी दूषित व खाऱ्या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने
श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुषीत पाण्याने शारीरिक बाधा निर्माण झाल्यास त्यास ग्रामपंचायत व पंचायत समितीस जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या अमरापूर गावातील नागरिक गेल्या एक महिन्यापासून पाणी पाणी करीत आहेत. दिपावली सणाच्या आगोदर पंधरा दिवसांपासुन बंद करण्यात आलेल्या पाणपुरवठा अद्यापही पुर्ववत सुरु झालेला नाही.
आठ दिवसांतुन एकदा होणाऱ्या पाणी पुरवठ्यास अव्वाच्यासव्वा सक्तीच्या पाणीपट्टी वसुलीसाठी पाणी बंद करुन नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
आठ दिवसांपासुन हवामानात बदल होत असल्याने वातावरण दुषीत झाले आहे. अशातच पिण्यासाठी दुषीत पाण्याचा वापर करणे भाग पडत असल्यामुळे लहान बालके, वृद्धांसह नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत असून,
हे आजार बळावण्याची भिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अमरापुर ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आहे. आमदार भाजपाच्या आणि केंद्रात व राज्यातही भाजपाची सत्ता असताना गावात महिन्यापासुन पाणी नाही, याच गावात पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याचे टँक्कर भरले जातात.
आसपासच्या लाभार्थी खेड्यांना येथुनच पाणी पुरवठा होतो. मात्र, अमरापुरच्या ग्रामस्थांना महिन्यापासुन पाण्यासाठी वेठीस धरल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेवगावच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणुन देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी केवळ दबावामुळे आपल्या पदाची जबाबदारी विसरून हात वर केले आहे. तत्काळ येथील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
■महिन्यापासुन गावात पाणी नाही, काही ग्रामस्थांनी दिपावली सण केला नाही. मात्र, पाणीपट्टी भरली. दोन दिवस थोडे थोडे पाणी देऊन पुन्हा पुरवठा बंद केला. तीन वर्षापासुन उत्पन्न नाही, मग अव्वाच्यासव्वा पाणी पट्टी कशी भरणार. पाणी सोडण्याबाबत चर्चा केली असता, सरपंच वसुली शिवाय सोडणार नाही, असा निर्णय घेत असल्याने खारे पाणी पिण्याची वेळ आली आहे. – चंदा खैरे, ग्रामपंचायत सदस्य
■योजनेचे पाणी बंद झाल्यामुळे महिन्यापासुन खारे पाणी वापरात येत असल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे आजार वाढले आहेत. होणारा परिणाम पाहता तातडीने सर्व ग्रामस्थांना पाणी सुरु करावे. –माया म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य