Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात अनेक परिसरात रविवारी संध्याकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले. अनेक परिसरातील उभे असलेले ऊस, मका पिके आडवी पडली. तर लाल कांदा व उन्हाळ कांद्याचे टाकलेले रोपे जमीनदोस्त झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर भिकाजी जावळे, गोवर्धन प्रभाकर जावळे व पुरुषोत्तम जावळे यांच्या नगदवाडी आनंदवाडी रस्त्याच्या बाजूला असलेले तीन एकर मकाचे क्षेत्र वादळाने पूर्ण आडवे पडले.
तर संजय फटांगरे, अण्णासाहेब साबळे यांच्या क्षेत्रातील ऊस पिके आडवी झाली. पंचकेश्वर कार परिसरात गणपत महादू राऊत यांनी आपल्या शेतामध्ये तीन एकर कांद्याची लागवड केली होती.
दोन महिने झालेल्या कांदाचे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सोनेवाडी, चांदेकसारे, पोहेगाव परिसरात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे व्हायला हवे होते.
मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही या विभागाचे अधिकारी या परिसराकडे फिरकले नाही. यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली उरला का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत न पाहता महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.