डोळ्यादेखत ऊस सुकत चालला असताना ‘उसाला तोड द्या’, म्हणत मागील वर्षी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांच्या मागे वनवन फिरून, हात जोडून, वारंवार विनवणी करावी लागत होती.
‘ऊसाला तोड मिळणार नाही, तुमच्या अगोदर खूप नंबर आहेत, तुमचा ऊस नोंदलेला नाही, नोंद उशिरा केली’, अशी एक ना अनेक कारणे देत ‘तुमचा ऊस दुसऱ्या कारखान्याला घाला, ‘ अशी उत्तरे शेवटी मिळत होती.
आता उलट परिस्थिती निर्माण झाली असून कारखानदारांनाच ऊसउत्पादकांना विनवणी करण्याची वेळ आली आहे. जो जास्त भाव देईल, त्याच कारखान्याला ऊस घालणार अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या हंगामात गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.
मागील काही वर्षांपासून उसाला तोड मिळणे म्हणजे मोठे अवघड काम होते. अपवाद वगळता ऊस तोडीसाठी मजुरांना पैसे मोजावे लागले. प्रसंगी व्हेज- नॉनव्हेज जेवणावळीची तरतूद करावी लागली.
तोडी वेळेवर न मिळाल्याने कारखान्याचे अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, अधिकारी यांच्यात व शेतकरी नातेवाईकांमध्ये कटूता निर्माण झाली. ती आजही तशीच बऱ्यापैकी टिकून आहे. ‘तुम्ही कारखान्याचे पदाधिकारी असूनही आम्हाला तोड देऊ शकत नाही, उसाचे वजन घटत असून तुमचा आम्हाला काय उपयोग?’ असे म्हणत सग्या- सोयऱ्यांनी राग व्यक्त केला; परंतु दम है तो बड़ी चीज है या उक्तीप्रमाणे आता कारखानदारांनाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनवणी करण्याची वेळ आली आहे.
यंदा उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखानदार आता ऊसउत्पादक शेतकरी व नातेवाईकांची मनधरणी करून आपल्याच कारखान्याला ऊस कसा मिळेल, याकरीता प्रयत्न करीत आहेत.
तर शेतकरी ‘आम्हाला जो कारखाना जास्त भाव देईल व यापूर्वी ज्या कारखान्याने आमची दखल घेतली, त्याला ऊस घालू’, असे म्हणत कारखानदारांना तसेच कारखान्याचे पदाधिकारी असलेल्या नातेवाईकांना आपल्या मागे भिंगरीप्रमाणे फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
मजूर निघून गेले, तर शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून आता कारखानदारांना ऊसतोड मजुरांच्याही पुढे-पुढे करावे लागत आहे. राज्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईचे संकट उभे राहिले आहे, त्यामुळे उसाला चारा म्हणून मागणी वाढत आहे.
परिणामी उसाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्त भाव मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस देण्याऐवजी चारा म्हणून ऊस विकत आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना उसाची तोड यावी म्हणून नको तिथे प्रयत्न करावे लागले. अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले. वेळप्रसंगी ऊस तोडीकरिता मजुरांना पैसे द्यावे लागले, जेवणावेळी द्याव्या लागल्या. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या काळात ‘ज्याचा वशिला तोच काशीला’ या उक्तीप्रमाणे तोंड बघून ऊस तोड झाल्याची चर्चा होती.
आता हात पसरायची वेळ कारखानदारांवर आली आहे. उसाचा तुटवडा असल्याने यंदा ऊसतोड मिळवण्यासाठी ना उसाला आग लावण्याची वेळ येणार, ना कुणासमोर हात जोडावे लागणार, ना कुणाच्या पाया पडावे लागणार. विशेष म्हणजे ऊस तोडीसाठी पैसे मोजायची गरज पडणार नाही, ना ऊसतोड मजुरांना अमिषे अथवा पार्टी द्यावी लागणार.
कारखान्यांच्या स्पर्धेत शेतकऱ्यांचा फायदाकारखान्यांचे गाळप सुरू होऊन काही दिवसच लोटले असून आताच ऊस तोडून नेण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक कारखाने जास्त भावाचे आश्वासन देऊन आम्हालाच ऊस द्या, अशी विनंती शेतकऱ्यांना करत आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या या स्पर्धेत शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
कारखान्यांचे संचालक व अधिकारी यांचे जवळचे नातेवाईकही त्यांचे ऐकायला तयार नाहीत, परिणामी कारखान्यांचे सूत्रधार या संचालक व अधिकाऱ्यांना ‘ नातेवाईकच तुमचे एकत नाहीत’, म्हणत धारेवर घरत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.