सध्या नगर शहरासह केडगाव उपनगरात गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरु आहे. घराघरापर्यंत हे पाईप कनेक्शन बसवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबलचे देखील काम सुरु आहे.
यासाठी रस्ता खोदाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान रस्ता खोदाई करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सादर केला आहे. हा दर किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
‘ अशा पद्धतीने केले आहेत दर प्रस्तावित :- खोदाईचे जे दर आहेत ते डांबरी रस्ता, काँक्रीटचा रस्ता, पेव्हर ब्लॉक आदी रस्त्यानुसार स्वतंत्र दर असणार आहेत. यासाठी साधारण प्रति रनिंग मीटरसाठी किमान ७ हजार २८९ ते १० हजार ७६३ रुपयांपर्यंत खोदाई शुल्क व १ हजार रुपये प्रति किलोमीटर प्रशासकीय शुल्क असे दर प्रस्तावित करण्यात आलेत.
प्रति रनिंग मीटर १५ हजार रुपये आकारण्याचे होते आदेश :-विविध कामांसाठी सध्या शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई सुरु आहे. त्यात गॅस पाईपलाईन असेल किंवा इतर कामे आहेत. यापूर्वी महापालिकेने तत्कालीन महासभेच्या ठरावानुसार २ हजार रुपये प्रति रनिंग मीटर दराने खोदाई शुल्क आकारले होते.
परंतु रस्त्याचे होणारे नुकसान पाहता स्थायी समितीने काही महिन्यांपूर्वीच प्रति रनिंग मीटर १५ हजार रुपये याप्रमाणे खोदाई शुल्क आकारण्याचे आदेश दिले होते. परंतु इतके शुल्क भरण्यास मोबाईल कंपन्या व गॅस कंपन्यांकडून असमर्थता दर्शविण्यात आली.
दरम्यानच्या काळात राज्य शासनाने खोदाई शुल्क आकारणी संदर्भात महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने नव्याने दर प्रस्तावित करून स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. आता हा दर १० हजार असावा असे म्हटले आहे. आता स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.