घरी रहा, कोरोनायोद्धा व्हा !

Ahmednagarlive24
Published:

वर्धा, दि १७  :- सध्या जगभरामध्ये कोविड-19 या आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आजुबाजूचे सर्व जिल्हे डार्क रेड झोनमध्ये असताना देखील वर्धा जिल्हा प्रशासनाने अतिशय प्रयत्नपुर्वक नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु, सध्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. संपूर्ण कुटुंबाला गृह विलगिकरणात ठेवण्यात आले असतानाही अनेक लोक घराबाहेर निघत आहेत.

7 हजार कुटुंबांनी घरात रहावे यासाठी प्रशासनाच्या वतीने उद्या 18 मे ला घरात रहा कोरोना योद्धा व्हा या अभियानांतर्गत एकाच दिवशी गृह विलगिकरणातील नागरिकांच्या घरी भेट देण्याची विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले लोक आता आपापल्या घरी परत येत आहेत. कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे या आजाराचा प्रसार इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार त्यांच्या सोईकरिता संस्थात्मक विलगिकरण न करता संपुर्ण परिवारासहित गृहविलगीकरण करण्यात येत आहे.

पण तरीही काही नागरिक घराबाहेर पडून इतर लोकांमध्ये मिसळत आहेत. अशा व्यक्तींपैकी चुकून एखादी व्यक्ती जरी बाधित निघाली तरी सामूदायिक संसर्ग होण्याची मोठी शक्यता लक्षात घेता अशा व्यक्तींची जनजागृती करणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत घरात राहणे हे सुद्धा कोरोना योध्याचे कर्तव्य बाजावण्यासारखेच आहे. या व्यक्तींनी घरी राहिल्यास प्रत्यक्ष कोरोना योद्ध्याचे काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम पुढे कमी होईल.

त्यामुळेच जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून ‘घरी रहा कोरोना योद्धा व्हा’ ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

उद्या 18 मे रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात गृह विलगिकरणात असलेल्या 7 हजार 240 कुटुंबांच्या घरी जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी  प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना घरी राहण्याचे महत्त्व समजावून सांगणार आहेत.

स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक या जनजागृती मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होतील.

अधिकारी, कर्मचारी या मिशनमध्ये सहभागी होऊन गृहविलगिकरणात असलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करतील.

या मोहिमेत, सुजाण नागरिकांनी सुद्धा सहभागी होऊन या मोहिमेचा भाग व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment