जे व्हायला नको तेच झाले ! ताटातील चपाती-भाकरी महागली

Ahmednagarlive24 office
Published:

बाजरी, ज्वारी, गहू, तांदळाच्या दरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या ताटातली चपाती, भाकरी महाग झाली आहे. गहू, बाजरीच्या दरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे आठ रुपयांनी किलोमागे वाढ झाली आहे. ज्वारीचेही दर एकोणीस रुपयांनी वाढलेले आहेत. तर तांदूळदेखील सात रुपयांनी महागले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर महिन्यात गतवर्षी गहू २६ ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. पण यंदा गहू २८ ते ४३ रुपयांनी विकला जात असून सरासरी ८ रुपयांची दरवाढ झाली आहे. गतवर्षी बाजरी २४ ते ३५ रुपये होती.

यंदा ती २८ ते ४३ रुपयांपर्यंत गेली असून सरासरी ८ रुपयांची दरवाढ झाली आहे. गतवर्षी ज्वारी २८ ते ४५ रुपये होती, मात्र यंदा दरात वाढ झाली असून ३५ ते ७५ रुपयांपर्यंत भाव पोहोचले आहेत. तांदळाच्या दरातही वाढ झाली आहे. गतवर्षी २९ ते ४६ रुपयांना मिळणारा तांदूळ यंदा ४० ते ५० रुपयांपर्यंत गेला आहे.

अवकाळी पाऊस, पुरामुळे पिकांची झालेली नासाडी यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दरात वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे बिस्कीट उत्पादक कंपन्या गहू जास्त प्रमाणात घेत असल्यामुळे बाजारात त्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ झाली आहे.

पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील रहिवासी बाजरी व ज्वारीचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते. पण आता आंध्र प्रदेश, पंजाब आदी राज्यांतील रहिवाशांनी देखील ज्वारी, बाजरीचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पूरस्थिती झाली होती. या राज्यामध्ये तांदळाचे उत्पादन जास्त होते. पण यंदा उत्पादन घटल्यामुळे तांदळाच्या दरात देखील वाढ झाली आहे, असे एपीएमसीच्या घाऊक बाजारातील व्यापारी भरत भानुशा यांनी स्पष्ट केले.

उत्पादनात घट झाल्यामुळे अन्नधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. पूरस्थिती, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादन घटले आहे. मागणी जास्त आहे. पण उत्पादन नसल्याने दर वाढले असून आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.

गतवर्षाच्या तुलनेत गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, या सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या सर्वच अन्नधान्यांचे दर वाढल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. महागाई वाढत चालली आहे. पण त्या तुलनेत सर्वसामान्यांचे उत्पन्न मात्र वाढत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe