शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी : दूध खरेदी गुणवत्तेच्या निकषात बदल !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : दुधाचा प्रतिलीटर ३४ रुपयांचा बेस रेट २७ रुपयांपर्यंत खाली आल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी दुधाची गुणवत्ता ठरवण्याचे स्निग्धांश (फॅट) आणि सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) चे प्रमाण ३.५/८.५ वरून ३.२/८.३ असे कमी केले आहे.

दरम्यान, दूध स्वीकारण्याचे निकष (मानक) शासनाने ठरवले असले तरी ३.२/८.३ गुणवत्तेच्या दुधाला किती दर देणार हे जाहीर करा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी केली आहे.

राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघानी दूध खरेदी करताना प्रतिलिटर गुणवत्तेनुसार दिला जातो. दुधाची ही गुणवत्ता स्निग्धांश (फॅट) आणि सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) यावरून ठरवली जाते.

उत्तम प्रतिच्या दुधाचे हे प्रमाण राज्याने ३.५/८.५ असे निश्चित केले आहे. ३.५ /८.५ या गुणवत्तेच्या प्रति लिटर दुधास ३४ रुपये शेतकऱ्यास देण्यात यावे, असे जुलै २०२३ शासन निर्णयाद्वारे निश्चित केले होते.

मात्र मागील आठवड्यात दूध दर प्रश्नी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसोबत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दूध स्वीकारण्याच्या मानकात ३.५/८.५ वरून ३.२/८.३ असा बदल करण्याची ग्वाही यांनी दिली होती.

त्यानुसार सरकारने ३.२/८.३ या गुणवत्तेचे दूध विकण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय (जीआर) बुधवारी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने काढला आहे.

दरम्यान, यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. दूध स्वीकारण्याचे निकष कमी केल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर एक ते दीड रुपयांचा फायदा होणार असला तरी सद्यस्थितीत ३४ रुपयांवरून २७ रुपयेपर्यंत प्रतिलिटर दुधाचे भाव खाली आल्याने शेतकरी संतप्त आहेत.

उसासारखी दुधाला एफआरपी जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र नाशवंत पदार्थ असल्याने व मागणी व पुरवठा हे प्रमाण सातत्याने बदलत असल्याने एफआरपी निश्चित करणे शक्य नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे दुधाचे भाव पडल्यामुळे शेतकरी तोट्यात दुग्धव्यवसाय करत असल्याने आंदोलन करत आहेत यातून राज्य सरकार कसा मार्ग काढते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे

नव्या निकषानुसार बेस रेट जाहीर करा अजित नवले

सरकारने ३.५/८.३ गुणप्रतीच्या दुधाला जसा ३४ रुपये बेस रेट जाहीर केला होता. तसा आता ३.२/८.३ गुणप्रत या नव्या निकषानुसारही दुधाचा बेस रेट जाहीर करावा.

तसेच त्या बेस रेटनुसार खासगी दुधसंघ व कंपन्यांनी शेतकऱ्यांना भाव दिला नाही तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe