कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडीच्या जवळ एका भरधाव क्रुझर गाडीने कर्मवीर काळे कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला काल गुरूवारी (दि. ३०) सकाळी जोराची धडक दिली.
त्यामुळे ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर क्रुझरचा चालक तेथून पसार झाल्याची माहिती ऊसतोड कामगार सुपडू बाबु जाधव यांनी दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच १६० चे चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून अद्याप बाजूचा पालखी मार्ग देखील अनेक ठिकाणी अपूर्ण आहे.
या महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अतिशय भरधाव वेगाने वाहने या रस्त्यावर धावत असतात. परंतु दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी नसल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडते.
त्यामुळे अनेक वेळेस अपघात होतात. तसेच झगडे फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकमेकांना छेदून जात असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनधारकांची अनेक वेळेला धांदल उडते.
त्यातच काही नागरिक स्शॉर्टकटर मारण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे असताना मात्र येथे वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान, (दि.२५) रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आनंदवाडी या ठिकाणी साई दर्शनाला शिर्डीकडे जाणारी कार व चांदेकसारे येथील बाजार करून आपल्या घराकडे परतत असताना बाबासाहेब कारभारी माळी व नाना सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर पुन्हा चारच दिवसात दुसरा अपघात झालेला आहे. या अपघातात सुपडू बाबु जाधव (वय ४०) व त्याची पत्नी रणजुबाई सुपडू जाधव (वय ३५, मुळ रा. शिवापूर, ता. चाळीसगाव) हे आपल्या बैलगाडीवर चांदेकसारे शिवारात ऊस तोडणीसाठी काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी जात असताना ६.३० वाजेच्या सुमारास पाठीमागून शिर्डीकडे जाणारी क्रुझर गाडीने पाठीमागून धडक दिल्यामुळे महिला रणजुबाई व एक बैल गंभीर जखमी झाले आहेत.
धडक देऊन वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. ही घटना घडली, तेव्हा गौतम बँकेचे संचालक शरद होन तेथून सकाळी फिरायला जात असताना त्यांनी तातडीने काळे कारखान्याचे शेतकी अधिकारी कैलास कापसे यांना संपर्क करून घटनेची कल्पना दिली.
त्यांनी आपले सहकारी उद्धव होन यांच्यासह घटनास्थळी येऊन जखमींना डॉ. रोकडे यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यावेळी परशराम खरात सह ग्रामस्थांनी जखमींना मदत केली.