समाजातील अनेक घटकांच्या आर्थिक विकासाकरिता अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवते व यासोबत अनेक महामंडळ देखील विशिष्ट समाज घटकांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील असतात. अशा योजना किंवा महामंडळांच्या अनेक योजना असून या माध्यमातून त्या त्या समाज घटकातील तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो.
त्यामुळे अशा योजनांचा लाभ उठवून स्वतःचा आर्थिक विकास साधणे खूप गरजेचे आहे. अनेक सवलती देखील या माध्यमातून तरुणांना मिळत असतात. अशा महामंडळाच्यामध्ये जर आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विचार केला तर मराठा समाजाच्या तरुणांसाठी या महामंडळाच्या माध्यमातून अनेक कर्ज योजना राबवल्या जातात.

उदाहरणच घ्यायचे झाले तर या महामंडळच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज योजना राबवल्या जातात व त्यासोबतच समूह व्यवसाय करणाऱ्यांना देखील आर्थिक मदत केली जाते. याच दृष्टिकोनातून आपण या लेखात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या काही योजनांची माहिती घेणार आहोत.
गटाने व्यवसाय सुरू कराल तर मिळेल 50 लाख रुपये कर्ज
मराठा समाजाच्या युवकांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे वैयक्तिक कर्ज योजना राबवतेच. परंतु त्याशिवाय समूहाने किंवा गटाने व्यवसाय करणाऱ्या तरुणांना देखील आर्थिक बळ देण्याचा निर्णय या महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला असून अशा गटाने व्यवसाय उभारणाऱ्या व्यक्तींना सात वर्ष मुदती करिता 50 लाख रुपयांचे कर्ज आता या माध्यमातून मिळणार आहेच व महत्त्वाचे म्हणजे यावरील व्याज परतावा देखील सरकारच भरणार आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिली. जर आपण वैयक्तिक कर्जाचा विचार केला तर या महामंडळाकडून व्यवसाय उभारणी करिता 15 लाख रुपयाचे कर्ज दिले जाते व 15 लाख रुपये कर्जावरील व्याजाचा परतावा देखील राज्य सरकार देते.
परंतु बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवर मोठ मोठे प्रकल्प किंवा व्यवसाय उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा तरुणांकरिता समूहाने व्यवसाय उभे करण्याची संधी देखील आता राज्य सरकार देणार आहे. या माध्यमातून 50 लाख रुपयांचे कर्ज मिळेल व संबंधित गटाने जर कर्जाची नियमितपणे परतफेड केली तर त्या कर्जावरील सात वर्षांचे व्याज राज्य सरकार भरणार आहे. याबाबतचे धोरण तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी देखील लवकरात लवकर केली जाणार आहे.
गट प्रकल्प व्याज परतावा योजनेला पाच वर्षांची मुदत
तसेच महत्त्वाचे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सध्या गट प्रकल्प व्याज परतावा योजना सुरू असून याची मुदत पाच वर्षाची आहे. या माध्यमातून पाच वर्षापर्यंतचे व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. परंतु मोठी रक्कम असल्यामुळे पाच वर्षात ही रक्कम भरणे किंवा फेडणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. त्यामुळे पुढील व्याज संबंधित कर्जदाराला भरावे लागत होते. परंतु आता हे व्याज सात वर्षांपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून भरले जाणार आहे.
महामंडळाकडून आता शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर देखील मिळणार व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून आतापर्यंत व्यवसायासाठी कर्ज आणि त्यावरील व्याज परताव्याचा लाभ दिला जात होता. परंतु आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी देखील आता महामंडळ कर्ज उपलब्ध करून येणार असून या कर्जावरील व्याज परतावा देखील आता दिला जाणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.