पोलीस यंत्रणेचा अविभाज्य भाग व गावामध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांचा दुवा व दूत, अशी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील यांची संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये सुमारे ७४ पदे रिक्त आहेत.
पोलीस पाटील यांची भरती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली जात असल्यामुळे या गावात होणारी भांडणे, गावातील माहिती पोलीस व सरकारी कार्यालयात कोणी पुरवायची? असा प्रश्न या ७४ गावांमध्ये निर्माण झाला होता. नुकतेच संगमनेरचे प्रातांधिकारी शैलेश हिंगे यांनी पोलीस पाटील भरतीच्या आरक्षण सभेचे जाहीर प्रकटन काढल्यामुळे पोलीस पाटील भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सरपंच व पोलीस पाटील ही गावातील महत्वाची पदे असल्याने त्यांच्या कामाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत चालल्या आहेत. पोलीस पाटील पद अनेक अर्थाने महत्वाचे आहे, तर सरपंचपद हे बदलणारे असल्याने तो एक राजकीय प्रक्रियेचा व घडामोडींचा भाग असतो.
राजकीय घडामोडींपासून अलिप्त व सुरक्षित आणि कायमस्वरुपी असणारे पोलीस पाटील हे पद आहे. संगमनेर तालुक्यातील पोलीस पाटील पदे भरली जात नाहीत, ही शासकीय उदासीनतेची उदाहरणे असल्याचे बोलले जाते.
वास्तविक संगमनेर प्रांताधिका- यांच्या अधिकारात ही पदे भरली जाऊ शकता; परंतु तीही पदे का भरत नाहीत, हा मोठा प्रश्न नेहमी विचारला जात असल्याने अखेर या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजात पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने तंटे मिटवण्यात अनेक अडचणी येत आहेत. गावात पोलीस पाटील हे पद रिक्त आहे.
त्या-त्या ठिकाणी अंमलबजावणीत संथपणा असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्याकरिता समिती व पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे प्रयत्न केले जात असले, तरी त्यात रिक्त पदांमुळे अडथळा निर्माण होत आहे.
पोलीस पाटील नसलेली गावे :- संगमनेरातील गुंजाळवाडी, वेल्हाळे, कासार दुमला, जवळे कडलग,रहिमपूर, मनोली, ओझर खुर्द, कोची, मांची, माळेगाव पठार, कौठे खुर्द, म्हसवंडी, कौठे बुद्रक, वनकुटे, येलखोपवाडी, कोळवाडे, रायते, कोल्हेवाडी, निबांळे, अंभोरे, डिग्रस, शिरापूर, सावरचोळ, सांगवी, कौठे धांदरफळ, मिर्झापूर, पिंपळगाव कोंझिरा, कुरण,
माळेगाव हवेली, निळवंडे, तिगाव, मेंढवन, कौठे कळमेश्वर, वाबळेवाडी, सारोळे पठार, सावरगाव घुले, गाभणवाडी, झोळे, शिबलापूर, पानोडी, पिंप्री-लौकी, अजमपूर, दाढ खुर्द, आश्वी खुर्द, पिंपळे, नान्नज दुमाला, लोहारे, मिरपूर, निमोण, पळसखेडे, सोनेवाडी, कन्हे, मांडवे बुद्रक, बिरेवाडी, शिंदोडी,
दरेवाडी, कौठे मलकापूर, शेंडेवाडी, खांबे, खरशिंदे, पिंपळगाव देपा, कोकणगाव, शिवापूर, चिंचोली गुरव, खराडी, बोरबनवाडी, उंबरी, वडगावपान, निमगावजाळी, सुकेवाडी, भोजदरी, पोखरी बाळेश्वर, वरंवडी, जवळे बाळेश्वर व हिवरगाव पावसा या गावातील पोलीस पाटील पद रिक्त आहे.