संविधानात अनुसूचित जाती, जमातीसाठी दिलेले आरक्षण हे संविधानिक आहे. ते इतर बाकीच्या कोणाला देणे शक्य नाही. तेव्हा धनगर समाजाला जरूर आरक्षण द्या, पण ते स्वतंत्रपणे देण्यात यावे. ते अनुसूचित जमातीतून देण्यात येऊ नये, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. हिवाळी अधिवेशनात या मुद्द्द्यांवर सरकारकडून सकारात्मक मार्ग काढून ते मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठ्यांना देण्यात येणारे आरक्षण हे हक्काचे व न्यायालयात टिकणारे मिळाले पाहिजे, यासाठी सरकारबरोबर मीही आग्रही आहे. मी विधानसभेत या ठरावाच्या बाजूने स्वतःचे मतदान करेल, अशी माहिती आदिवासी राखीव अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.
अकोल्यात शासकीय विश्रामगृहावर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस आ.डॉ. किरण लहामटे यांच्यासह शरद चौधरी, अक्षय आभाळे आदी उपस्थित होते.
अकोल्यात मंजूर झालेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाबाबत आ. लहामटे म्हणाले, माझ्या संकल्पनेतील ५ प्रमुख विकास कामापैकी शनिवारी अकोले उपजिल्हा रुग्णालयाला ३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली.
शिंदे-फडणवीस सरकारमधे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने खास बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. ते पूर्ण होण्यास किमान वीड-दोन वर्ष जातील. उपजिल्हा रुग्णालय हे मविआकडून मंजूर करण्यात आले असून ना. अजित पवार यांनी खास बाब म्हणून मंजूर केले.
याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सहकार्य केले.हा विषय श्रेयवादाचा नाही. पण हे काम शिंदे- फडणवीस-पवार सरकारकडून देण्यात आले. प्रलंबित कामे मार्गी लावणार असून अकोले बसस्थानकाला ७ कोटी दिले. या कामाच्या शुभारंभास ना. अजित पवार यांना आणण्याचे माझे प्रयत्न आहेत.
अगस्ती कारखान्याच्या रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला, पण वर्क ऑर्डर नसल्याने ठेकेदारांकडून ते बंद करण्यात आले. ते काम करण्याचे प्रयन आहेत. मतदारसंघातील प्रलंबित जलसंधारण व रस्त्यांची कामे मार्चपर्यंत मार्गी लागतील, असे डॉ. लहामटे यांनी सांगितले.
अकोले एमआयडीसीसाठी तालुक्यात योग्य जागा उपलब्ध होत नाही. म्हणून मुळा खोऱ्यातूनच २०० ते ३०० एकर जागेवर छोटी एमआयडीसी निर्माण करण्याचे माझे प्रयत्न आहेत. जर उद्योजकांकडून प्रतिसाद व जागा मिळाल्यास अकोल्यात एमआयडीसी निर्माण करण्यास प्राधान्य देऊ. राजूरचा पिंपरकणे उड्डाणपूल १७ वर्षांपासून प्रलंबित होता, तो मी लक्ष देऊन पूर्ण केला. असेही आ.डॉ. लहामटे म्हणाले.