शून्य गाठलाय… आता हवा निश्चय!

Ahmednagarlive24
Published:

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता आणि ते स्वाभाविक देखील होते.

करोनाविरुद्धच्या या युद्धातील पहिल्या टप्प्यात त्यांनी यश मिळवून 19 रुग्णांना त्यापासून दूर नेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते.

साधारण एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जनतेशी सातत्याने संवाद साधत आपण यातून बाहेर येवू शकतो हा विश्वास निर्माण केला.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जाहीर झालेल्या संचारबंदीतही जनतेला कमी त्रास कसा होईल याची दक्षता घेण्यात आली.

आजच्या यशात अनेक करोना वीरांचे योगदान आहे. पोलीस विभागाने अहोरात्र परिश्रम करून जिल्ह्याच्या सीमा संसर्गाच्यादृष्टीने सुरक्षित कशा राहतील याकडे विशेष लक्ष दिले.

संचारबंदी मोडणाऱ्यांविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाई करताना जनप्रबोधन आणि जनसेवेवरही भर दिला. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून रुग्णांची सेवा केली, प्रसंगी त्यांना मानसिक बळही दिले.

प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मजूरांची व्यवस्था असो वा नियमांची अंमलबजावणी, सतत व्यस्त होते. नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची भूमीकादेखील महत्त्वाची होती.

अनेक ठिकाणी फवारणी, स्वच्छता, सीमाबंदी यावर भर देण्यात आला. कौतुकाची बाब म्हणजे ग्रामीण जनतेतदेखील जागृती पहायला मिळाली. ‘ॲन्टी कोविड फोर्स’च्या माध्यमातून मदतीसाठी अनेक तरुण पुढे आले.

तर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे केला.

शासनस्तरावर धान्यवाटप, मजूरांच्या भोजनाची सुविधा, बाहेरील राज्यातील आपल्या नागरिकांना परत आणणे आदी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्वत: मुख्यमंत्री नागरिकांशी सातत्याने संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, पत्रकार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका अशा प्रत्येक घटकाची कामगिरी उपयुक्त ठरली आहे.

प्रशासनाने दरम्यानच्या काळात नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्य वाटप वेळेवर करण्याचे नियोजन केले.

मनरेगाच्या माध्यमातून 30 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा बाहेरील आदिवासी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात सुरक्षितपणे परत आणले.

शासन आणि प्रशासनाच्या निर्णयामुळे जनजीवन हळूहळू सामान्य होत आहे. ग्रामीण भागात आर्थिक व्यवहारांना गती मिळतेय. शहरी भागातही टप्प्याटप्प्याने शिथीलता देण्यात येत आहे.

करोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. हे संकट किती काळ चालेल याचे भाकीतही कोणी करू शकत नाही. अशा परिस्थितीत संसर्गापासून स्वत:ला दूर ठेवणे हा एकमेव उपाय आहे.

आज महिन्याभरानंतर रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मात्र या संकटाला कायमचे दूर ठेवण्यासाठी अधिक दक्षता घेणे आणि स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.

त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर निश्चय करणे गरजेचे आहे. निश्चय दोन व्यक्तीत सहा फुटाचे अंतर ठेवण्याचा, बाहेर फिरताना मास्कचा वापर करण्याचा, वारंवार हात धुण्याचा, सॅनिटायझरचा वापर करण्याचा…..

….मी माझ्यापुरते बघेन अशी भूमिका घेतल्यास हा आजार पुन्हा डोके वर काढू शकेल. कोरोनाशी एकत्रित होऊनच लढावे लागेल. आजपर्यंत ते ऐक्य दाखवून आपण जिल्ह्याला सुरक्षित वातावरणात नेले आहे.

यापुढे आपल्या गावात, वस्तीत येणारी नवी व्यक्ती कुठून आली आहे, तिच्यात आजाराची काही लक्षणे आहेत का हे पाहून त्याची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल.

सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी लागेल. तरच सर्व व्यवहार सुरळीत होऊन आपले जीवन सामान्य होऊ शकेल.

जनजीवन पूर्ववत होण्याची आपण सर्व वाट पहात आहोत. शासन पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. सर्व स्तरावरून त्याचे प्रतिबिंब दिसते आहे.

यात ‘मी माझे योगदान देऊन जिल्हा कायमस्वरुपी कोरोनामुक्त करेन’ हा निश्चय केल्यास लवकरच बाजारात पूर्वीप्रमाणे लगबग दिसेल, खेळाची मैदाने फुललेली दिसतील,

शाळेच्या घंटेचा हवाहवास आवाज विद्यार्थ्यांना ऐकता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना योद्ध्यांचे परिश्रम सफल होऊन या संकटावर आपण मात करू. मग कराल ना हा निश्चय… प्रशासनाच्या सुचनांचे पालन करायचा…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment