सिनेस्टाइल थरार ! छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकांवर छापे,करोडोंचे घबाड सापडले..एसीमध्ये पेनड्राइव्ह तर कचरा कुंडीत कागदपत्रे होती..

Ahmednagarlive24 office
Published:
Income tax raid

Income tax raid : आयकर विभाग सातत्याने विविध ठिकाणी कारवाई करत असते. नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील आठ ते दहा बड्या व्यावसायिकांवर आयकरने कारवाई केली. सलग पाच दिवस पुणे आयकर अन्वेषण विभाग छापे टाकत होते.

यात अगदी सिनेस्टाइल थरार घडत होता. एसीमध्ये पेनड्राइव्ह तर कुठे कचराकुंडीत कागदपत्रे सापडत होती, तर कुठे व्यावसायिकांचे बंधूच अधिकाऱ्यांना कर्मचारी बनून चकमा देत होते. यात आयकर विभागाने सुमारे १३०० कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आणले असून सहा कोटींची रोकड, चार कोटींचे दागिने, मौल्यवान हिरे आदी चीजवस्तू केल्यात.

३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत ही छापेमारी करण्यात आली पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील आयकर अन्वेषण विभागाच्या ३०० ते ३५० अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी सहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील आठ ते दहा व्यावसायिक व त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर छापे टाकत झडती घेतली होती.

* कुठे एसीमध्ये पेनड्राइव्ह निघाले तर कुठे कचरा डब्यात कागदपत्रे

या छापेमारीच्या दरम्यान, पथकाने अगदी बारकावे लक्षात घेऊन कारवाई केली. पथकाला निदर्शनास आले की, एका व्यावसायिकाच्या कार्यालयातील दोन महिला दुपारी अचानक घरी निघून गेलेल्या होत्या, त्यानंतर लगेच पथकाला संशय आल्याने त्यांनी पाळत ठेवली.

रात्री या महिलांच्या कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने त्यांच्या घरी जाऊन काही कागदपत्रे असलेली पिशवी व इतर साहित्य दिल्याचे या पथकाच्या लक्षात आले. पथकाने यांच्या घराची कसून तपासणी सुरु केली असता हाती काही लागेना,

शेवटी घरातील फ्रीजखालून व जिन्यातील कचऱ्याचा डबा व कागदी खोके बाजूला करून तेथून कागदपत्रांनी भरलेली पिशवी तब्येत घेतली. यामधून १०० कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घराचीही तपासणी सुरु असताना पथकाला एसीचा एक फ्लॅप उघडा दिसला. तो खोलताच तिथूनही हार्डडिस्क व पेनड्राइव्ह मिळाले, पथकाने ते जप्त केले.

* अनेक व्यवहार रोकडचं

ज्या उद्योजकांवर छापे टाकले त्यांच्याकडून कापडी पिशव्या भरभरुन २० किलो वजनाइतकी कागदपत्रे जप्त केली आहेत. कर चुकवण्यासाठी सर्व रोखीनेच व्यवहार करत असल्याचे समोर आले असून या व्यवहारांच्या पावत्या, बिले, ग्राहक कंपन्या, पुरवठादारांची नावे, रक्कम लिहिलेली कागदपत्रे पथकाने जप्त केली.

* व्यावसायिकाच्या भावाची कर्मचारी बनून बनवाबनवी

पथक एका कापड व्यावसायिकाच्या कार्यालयात दिवसभर होते. तेथे एक कर्मचारी माहिती देत होता. रोखीचे व्यवहारच नसल्याचे सांगून कागदपत्रे दाखवताना मोजक्याच फाइल तो आणून दाखवायचा. पथकाच्या हाती काही लागेना.

रात्री उशिरा त्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांची नजर चुकवून एक बॅग एका आलिशान कारच्या डिक्कीत ठेवली व मालकाला घरी सोडायचे आहे असे सांगून निघाला. पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो क्रांती चौकातून वेगवेगळ्या मार्गांनी गाडी चालवत मालकाला घरी सोडले.

परंतु हे पथक मागे असल्याचे लक्षात आल्याने तिथून तो पुन्हा पुढच्या रस्त्याने गल्लीबोळातून जात घराजवळ गाडी लावून तो पायी तेथून निघाला. पथकाला संशय आल्याने त्यांनी त्या मालकाचे घर गाठले. तेव्हा कर्मचाऱ्याचे सोंग घेणारा तो त्या व्यावसायिकाचा बंधूच आहे हे निष्पन्न झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe