शिवसेनेच्या नगर उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ! शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते नितीनराव औताडे यांची शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी तर बहादरपूर येथील बाळासाहेब राहणे यांची कोपरगाव तालुका शिवसेनाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या नगर उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. यामध्ये औताडे व रहाणे यांच्या निवडीचा समावेश आहे.

नितीन औताडे यांनी २०१७ मध्ये मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेचे काम हाती घेतले. कोपरगाव तालुक्यात पक्षप्रमुखाच्या आदेशाने शिवसेनेचे अनेक मेळावे, सभा संपर्कप्रमुख सुनील शिंदे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनासाठी घेतल्या होत्या.

शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तालुक्यात ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांनी लढवल्या. त्याचप्रमाणे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील शिवसेना पक्षाचे दोन प्रतिनिधी त्यांनी बिनविरोध पाठवले.

याच कामाची दखल घेत औताडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. तर रहाणे यांनी बाल शिवसैनिक म्हणून काम केले होते. गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच तर शिवसेना पक्षाच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य ते झाले.

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तालुक्यात त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने गेल्या अनेक वर्षापासून मातोश्रीपर्यंत कोपरगाव तालुक्यातील पदाधिकारी बदलांच्या हालचालीचे नियोजन सुरू होते.

अखेर बाळासाहेब राहणे यांची कोपरगाव तालुका शिवसेनाप्रमुख पदी निवड जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील शिवसैनिकांना आनंद झाला. या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल, अशी चर्चा कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe