Ahmednagar Breaking : वडील व मुलाचे जीवघेणे भांडण सुरु होते. पुढील काही अनर्थ ओढवू नये यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी आले. परंतु त्यांच्यावरच बाप- लेकाने सुरी-काठीने हल्ला केला.
ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील काशीद मळ्यात घडली. ९ डिसेंबरला रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला. जखमी पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेजस दत्तू काशीद,

दत्तू काशिनाथ काशीद (दोघेही रा. काशीद मळा, वडगाव पान, ता. संगमनेर) असे आरोपी बाप-लेकाची नावे आहेत.
अधिक माहिती अशी : तेजस काशीद आणि दत्तू काशीद यांच्यात भांडण सुरू असल्याचा फोन पोलीस ठाण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल टोपले, पोलिस हेड कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप या तिघांनी घटना स्थळी अर्थात काशीद मळ्यात धाव घेतली.
तेथे तेजस काशीद आणि दत्तू काशीद हे मारत होते. पोलिसांनी त्यांची सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तेजस काशीद याला पोलिस वाहनात बसवले. परंतु त्याने गाडीत बसण्यास मज्जाव करत विरोध केला. दत्तू काशीद याने पोलिसांना ‘आमची घरातील भांडणे आहेत,
तुम्ही त्याला नेऊ नका. नाहीतर मी तुम्हाला दाखवून देईन,’ अशी धमकीच त्याने पोलिसांना दिली. तेजस काशीद याच्या हातात भाजी कापण्याच्या सूर होता त्याने त्या सुरीने पोलिस हेड कॉन्स्टेबल शेंगाळ यांच्या डोक्यात आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल घोलप यांच्या हातावर वार केले.
दत्तू काशीद याने देखील पोलिसाना मारले. त्याने पोलिस हेड कॉन्स्टेबल टोपले यांना काठीने मारहाण केली. जखमींवर सध्या उपचार सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तेजसने वडिलांच्या डोक्यात घातली टिल्लू मोटार
दत्तू काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तेजस काशीद याची बहीण घरात झोपली होती. तिला वडील दत्तू काशीद यांनी मारहाण केल्याचा गैरसमज तेजसचा झाला. त्याने लगेच वडील दत्तू काशीद यांना काठीने मारहाण करत त्यांच्या डोक्यात टिल्लू मोटार मारली. यात ते जखमी झाले.