गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडले

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.

तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी आ. काळे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेण्यात येवून गोदावरी कालव्यांना काल शनिवार (दि.९) पासून सिंचनासाठी आवर्तन सोडले आहे.

पाटबंधारे विभागाकडून १ जानेवारी रोजी आवर्तन सोडण्याचे निश्चित होते. परंतु कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत रब्बी पिकांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडणार आहे. त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी तातडीने आवर्तन मिळावे, अशी मागणी आ. काळे यांच्याकडे केली होती.

तसेच कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात देखील अतिशय कमी पाणी शिल्लक राहिल्यामुळे अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे एकूण परिस्थिती व शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून आ. काळे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे तातडीने गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लावून धरली होती.

त्याबाबत मंगळवार (दि.५) रोजी माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन व शासकीय वाळू डेपोचे उद्घाटन प्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तनाबाबत आ. काळेंचा आग्रह असून त्यासाठी मागील काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात आहेत.

त्याबाबत तातडीने नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेणार असल्याचे त्यांनी त्यांनी जाहीरपणे सागितले देखील होते. त्याबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन पाटबंधारे विभागाला गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.

त्या आदेशानुसार शनिवार (दि.९) पासून बिगर सिंचन व रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडले आहे. प्रथम बिगर सिंचन त्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी पुरवठा करणारे लहान-मोठे सर्वच साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. सात नंबर पाणी मागणी अर्ज करणाऱ्या टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ द्यावा, अशा सूचना आ. काळे पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe