Ahmedngar News : राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जिल्ह्यात चांगलेच जोरावर आले आहे. विविध ठिकाणी कमानी चांगलाच जोर धरला आहे. परंतु काही ठिकाणी लोक कामांत अडथळे आणत आहेत. आता या लोकांना खा. सुजय विखे यांनी मोठा इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, असे रस्ते पुन्हा होत नसतात त्यामुळे लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. जो कोणी कामात अडथळे आणेल त्यांच्यावर तहसील, पोलिस, नगर परिषदेने संयुक्तपणे पोलिस कारवाई करा अशा सूचनाच त्यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात जामखेड येथे पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या.
टक्केवारीवर अनेकांनी बंगले बांधले
यावेळी खा. विखे यांनी टक्केवारीचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, त्यात तुम्हाला कोणीही टक्केवारी मागत नाही. अनेक ठिकाणी टक्केवारीवर अनेकांनी बंगले बांधलेत असा टोला खा. विखे यांनी लगावला आहे. असे रस्ते पुन्हा होत नसतात त्यामुळे लोकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकासकामात कधीच तडजोड करणार नाही.
या बैठकीत त्यांनी विविध गोष्टींचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की रस्त्याचे काम नियमानुसारच होईल. विकासकामात कधीच तडजोड करणार नाही. शहरातील कोठारी पेट्रोल पंप ते खर्डा चौकापर्यंत रस्त्याचे काम जलदगतीने सुरू करा.
खर्डा चौकात मोठा सर्कल करावा लागणार असून, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून बसवण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला महामार्गाचे अधिकारी डी. एन. तारडे, स्मिता पवार, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी अजय साळवे आदी उपस्थित होते.