Ahmednagar Breaking : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भावाला जेलमधून सोडविण्यासाठी आणलेली ५ लाखांची रोख रक्कम व एक मोबाईल असा एकूण ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल दोघांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लंपास केल्याची घटना दि.६ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव परिसरात भरदिवसा घडली.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दि.७ रोजी सुधादेवी चंदन कुमार सरोज (रा. उत्तमनगर, वेस्ट दिल्ली) यांच्या फिर्यादी वरून सुनिल, पुजा (पूर्ण नाव माहीत नाही) व सहा अनोळखी इसमांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची सूत्रे फिरवत गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कोळगाव येथील संजय मुरलीधर पिसाळ यांच्यासह कोक्या उर्फ पालखोर भास्कर चव्हाण, पूजा उर्फ घारी किरण भोसले (दोघे रा. विटेकरवाडी कोळगाव), या तिघांना अवघ्या २४ तासाच्या आत अटक करत न्यायालयात हजर केले तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिल्ली येथे रहिवासी असलेल्या फिर्यादी यांचा भाऊ येरवडा कारागृह पुणे येथे चोरीच्या गुन्हयात शिक्षा भोगत आहे. तेथे त्याची किरण (रा. चिखली) याच्याशी ओळख होऊन ओळखीच्या फायद्याचे त्यांना पैसे दिले तर ते चोरीच्या गुन्हयातून लवकर बाहेर काढतील असे अशी माहिती दिली.
त्यानुसार फिर्यादी यांचे आरोपी पुजा तसेच तिचा नातेवाईक असलेल्या सुनील याच्याशी बोलणे होऊन भावाला जेल मधुन सोडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत पैश्याची बोलणी केली.
त्यानुसार फिर्यादी या सैनी सोनी कुमार यांच्या सोबत दि.६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पूजा तसेच सुनील याने सांगितलेल्या ठिकाणी चिखली स्टॅन्डवर पैसे घेऊन आले. आरोपी सुनिल याने त्याचे मोटरसायकल वर बसवुन चिखली गावातुन पुढे जावुन जंगल व डोंगर असलेल्या कोरेगाव परिसरात घेवुन गेले.
त्या ठिकाणी पूर्वनियोजित लुटीसाठी पूजा, सुनिल व अनोळखी ६ इसम थांबले होते. सुनिल व पुजा यांनी साहेबांना द्यायला पैसे आणले का अशी विचारणा करताच आम्ही पैस आणले आहेत, परंतु ते पैसे आम्ही साहेबांनाच देणार असल्याचे सांगत साहेब कोठे आहेत, अशी विचारणा करत
साहेब दिसून न आल्याने त्यांना फसविले गेले असल्याचे लक्षात येताच माघारी निघून येत असताना आरोपी सुनिलने याने सैनी सोनी कुमार यांचे गळ्याला चाकू लावत इतरांनी दोघांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांचेकडील ५ लाख रुपये रोख तसेच १५ हजार रुपयांचा मोबाईल असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.