Ahmednagar News : डोंगरदऱ्यात व जंगलामध्ये आढळणारे बिबटे आता नागरी वस्तीमध्येही दिसू लागले आहे. शहरातील देवाचा मळा, घोडेकर मळा, पंचायत समिती परिसर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात भरवस्तीमध्ये १८ वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला होता.

या बिबट्याने तत्कालीन पोलीस निरीक्षकांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता बिबट्या सर्रास दिसू लागल्याने प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील देवाचा मळा परिसरात पंधरा दिवसांपासून एका बिबट्याचा मक्त संचार सुरू आहे या उपनगरातील अनेक नागरिकांनी या बिबट्याला पाहिले आहे.
वनखात्याला कळविल्यानंतर वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावला. मात्र हा बिबट्या अद्याप यात अडकलेला नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वेड्या बाभळी असल्याने बिबट्याला लपता येणे शक्य झाले आहे.
त्यामुळे या परिसरातील वेड्या बाभळी तोडण्यात आल्या आहे. शहरातील पंचायत समिती लगतच्या गुंजाळ नगर परिसरातही बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. काही महिन्यापूर्वी वनखात्याने या ठिकाणी आढळणारा एक बिबट्या पकडला होता.
याच परिसरात आता पुन्हा बिबट्याचा संचार वाढलेला आहे. या ठिकाणीही पिंजरा लावलेला आहे. मात्र या पिंजऱ्यात अद्याप बिबट्या अडकलेला नाही. वन खात्याने शहरातील उपनगरामध्ये फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधन केली जात आहे