अहमदनगर शहरातील अनेक शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे सुरु असल्याचे चित्र दिसते. हाच मुद्दा हेरंब कुलकर्णी यांनी देखील पुढे केला होता. त्यांच्यावर हल्ला होऊन हे प्रकरण राज्यभर गाजलेही होते. परंतु आता कोतवाली पोलीस या अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. आज कोतवाली पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात अतिक्रम करत अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई केली.
अतिक्रमणे काढत गुन्हे दाखल करण्याची कामगिरी पोलिसांनी केल्यामुळे शाळा महाविद्यालयांनी मोकळा श्वास घेतला आहे. पोलिसांनी या कारवाईत ऋषिकेश मोरे (रा.आदर्श नगर, कल्याण रोड), सीताराम गाडेकर (रा. हिंगणगाव ता. नगर) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य असा १० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे विशेष लक्ष
शाळा-महाविद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष लक्ष घातले आहे. शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमणे करून त्या ठिकाणी अवैधरीत्या मावा गुटखा विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या महिन्यात देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने महानगरपालिकेला सोबत घेऊन अतिक्रमाणावर कारवाई केली होती.
मात्र असे असताना पुन्हा अतिक्रमणाने डोके वर काढले होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक शाळांच्या परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी ही अतिक्रमणे हटवत कारवाई केली.
या पथकाने केली दबंग कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस आमदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, अभय कदम, रिंकू काजळे, सलीम शेख, शाहिद शेख, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे आदींच्या पथकाने ही दबंग कारवाई केली असून त्यांचे कौतुक होत आहे.