Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी देखील शरद पवार गटातून अजित पवार गटात केले. पण अनेक निष्ठावंत मात्र शरद पवारांसोबतच राहिले.
परंतु आता या निष्ठावंतांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे अकोलेतील पदाधिकारी निवडी. राष्ट्रवादी बंडानंतर डॉ. किरण लहामटे हे आधी अजित पवार यांच्यासोबत, नंतर शरद पवार यांच्यासोबत व पुन्हा अजित पवार गटासोबत गेले.
त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे हेही गेले. त्यांचे पूत्र महेश तिकांडे मात्र शरद पवार गटासोबतच राहिले. भानुदास तिकांडे गेल्याने त्यांच्या रिक्त जागी निवड करण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्षे यांनी मुलाखती घेतल्या.
त्यानुसार लवकरच पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होणार आहेत. दरम्यान या निवडीवरून शरद पवार गटातील खदखद व्यक्त होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासोबत होते, त्यांनाच संधी द्यावी.
आयात लोकांना लादण्याचा प्रयत्न केल्यास, वेगळा विचार करण्याचा सूचक इशारा काहींनी दिल्याने राजकारण तापले आहे.
वैभव पिचड यांच्यासाठी मते मागणारेच पदाधिकारी होणार?
शरद पवार गटाचे मीडिया प्रमुख अभिजित वाकचौरे यांनी आपली खदखद व्यक्त करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून दुसरा तालुकाध्यक्ष लादू नये याने पक्ष अडचणीत येऊ शकेल असे सांगत वैभव पिचड यांच्यासाठी मते मागणारेच, येथे पदाधिकारी होण्यास इच्छुक दिसतात.
निष्ठावंतावर ते लादल्यास कार्यकर्त्यांना अजिबात मान्य होणार नाही. अजित पवार गटाच्या नेत्यांच्या मर्जीने शरद पवार गटाचा तालुकाध्यक्ष व्हावा, यासाठी गनिमी कावा सुरू आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला. तर शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रा. चंद्रभान नवले यांनी निष्ठावंताला संधी द्यावी असे म्हटले आहे.