Marathi News : सध्या लग्न करताना मुलगी असो वा मुलगा असो त्यांच्या एकमेकांविषयी काही अपेक्षा असतात. बऱ्याचदा या अपेक्षा अवास्तव आहेत का? असाही प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं असे बडे बुजुर्ग म्हणतात.
पण बदलत्या काळानुसार मुलीही आपल्या इच्छा बोलून दाखवतात. नुकताच लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ६५० दिव्यांगांनी सहभागी होत प्रतिसाद नोंदवला. यावेळी या मुलामुलींनी एकमेकांविषयी असणाऱ्या इच्छा बोलून दाखवल्या.

मुली म्हणतात –
पती दिव्यांग असला तरी त्याला स्वतःचं घर, शेती, नोकरी किंवा व्यवसाय असावा. दिव्यांग वर नोकरीला असेल तर त्याला दरमहा किमान २० हजार रुपये वेतन असावे. तो निर्व्यसनी असला पाहिजे. नोकरी नसेल तर कुठलाही असो पण स्वतःचा व्यवसाय करणारा स्वावलंबी असावा.
मुले म्हणतात –
वधूने घरातील कामं, स्वयंपाक, संसार चांगला सांभाळावा. पत्नीचे व्यंगत्व ७० टक्क्यांहून अधिक नसावे. तिने नोकरी नाही केली तरी चालेल पण संसार उत्तमरित्या सांभाळला पाहिजे.
अपंग दिनानिमित्त मेळावा
जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी तसेच जिल्हा अपंग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त हा मेळावा घेण्यात आला होता. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, सातारासह १३ जिल्ह्यातील ६५० दिव्यांगांनी यात सहभाग नोंदवला.
दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी
यावेळी वसंत शिंदे यांनी अशी मागणी केली की, खासदार विखे यांनी दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्यात दोन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत त्यात दिव्यांगांसाठी काही जागा आरक्षित ठेवाव्यात.
शासकीय कार्यालयात मानसन्मान मिळवून देण्यासाठी खासदार विखे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले कायम दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग आघाडी अधिक कार्यक्षम असून राज्यात नावलौकिक मिळवला आहे असे अक्षय कर्डिले म्हणाले.