Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये मोठा राडा झाला आहे. अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून ही घटना घडली आहे. सुरवातीला बाचाबाचीचे प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेले.
अध्यक्ष बदलावरून बोलावण्यात आलेल्या बैठकीत विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये विश्वस्तांसह काही तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे समजते. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजता घडली असून काही जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
अधिक माहिती अशी : मागील काही दिवसांपासून श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात धूसफूस सुरू होतीच. यामुळे आज (गुरुवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्वस्तांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता अशी माहिती मिळाली आहे. परंतु या चर्चेदरम्यान दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यात स्थानिक तरुण मध्ये आले. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत पोहोचले. यामुळे या हाणामारीने उपस्थितांत मोठी धांदल उडाली होती.
दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने तरुणांसह काहीजण जखमी झाले. जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमली. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.