अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण व राजकारणाचे विविध पैलू हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नगर उत्तरेचे राजकारण जर पाहिले तर मंत्री राधाकृष्ण विखे व आ. बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत राहिले. दोघेही आपल्या स्थानी दिग्गज. अहमदनगरमधील दिग्गजांच्या यादीत या दोघांचेही नाव अदबीने घेतले जाते.
परंतु वैयक्तिक दृष्टया हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी. हे काँग्रेसमध्ये एकत्र होते तरीही आणि आता विरोधी पक्षात आहेत तरीही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दरम्यान आता त्यांच्यामध्ये नव्याने सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अहमदनगरच्या राजकारणात वेगळेच रंग भरू शकतात.

विखे थोरातांचे एकमेकांना हादरे-प्रतिहादरे
मध्यंतरी दोघेही शांत झाल्याचे दिसत होते. परंतु नुकतेच अनेक गोष्टींतून मंत्री विखे यांनी थोरात गटाला हादरे देण्यास सुरुवात केल्याचे दिसले. आता याची परतफेड आ. थोरात यांनी सुरु केली. त्यामुळे हा विखे-थोरात यांच्यातील संघर्ष एका वेगळ्या वळणावर पोहोचल्याचे समजले जाते.
आता हेच पहा, विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार थोरात यांनी महसूल मंत्री विखे यांना लक्ष करत त्यांच्या फसलेल्या नव्या वाळू धोरणावर टीका केली. या धोरणाचा तस्करांना कसा लाभ होतो असे सांगण्याकडे थोरात यांच्या टीकेचा रोख होता. त्याआधी महसूल मंत्रीपद स्वीकारताना विखे यांनी थोरात यांच्या काळातील वाळूतस्करी आणि महसूल विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन त्यांना लक्ष्य केले होते हे तुमच्या लक्षात असेलच.
आता त्याची परतफेड थोरात यांच्याकडून होताना दिसतेय अशी चर्चा आहे. आता दुसरं याविषयी घ्या. मंत्री विखे यांनी पुढाकार घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थोरात गट व एकत्रित राष्ट्रवादी आघाडीचे पाच संचालक फोडले. त्यांनी ही बँक भाजपच्या वर्चस्वाखाली आणली. त्यानंतर मग लगेचच थोरात यांनी विखे यांच्यावर नाराज असलेल्या कोल्हे गटाला बरोबर घेत गणेश सहकारी साखर कारखाना विखे गटाकडून हिसकावून घेत सत्ता स्थापन केली.
विखे-थोरातांच्या वादाचा राजकीय फायदा
विखे-थोरातांच्या वादाचा राजकीय फायदा दोन्ही पक्षांना दिसत आहे. थोरात यांच्या आक्रमक भूमिकेने जिल्हा काँग्रेसमध्ये जिवंतपणा येईल यात शंका नाही. पालकमंत्री विखे यांच्या वाटचालीने भाजपमधील निष्ठावंतांसह इतर राजकीय पक्षांत अस्वस्थतेचे वातावरण असल्याने त्यांनाही थोरात यांच्या भूमिकेने आधार मिळाल्याचे दिसत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध इतर सर्व असे चित्र निर्माण होते की काय असे वाटायला लागले आहे. गणेश कारखान्याच्या नव्या समीकरणामुळे कोपरगावमध्ये अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे आणि विखे हे असे नवे समीकरण जुळले.
एकमेकांना शह देण्यासाठी वापरतात ‘अशी’ यंत्रणा
मंत्रीपद मिळाल्यानंतर विखे यांनी घेतलेल्या भूमिकांना आ. थोरात शह देताना दिसतात. पूर्वी थोरात यांना एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मिळत होती परंतु आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर विखे गट अधिक प्रबळपणे वाटचाल करायला लागला आहे. पूर्वी थोरात गटाला हादरा देण्यासाठी काँग्रेसमध्ये असताना विखे गट भाजप-सेनेची मदत घ्यायचे हे सर्वश्रुत होते.
आता त्याच पावलावर पाऊल ठेवत थोरात विखे गटाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. थोरात यांनी भाजपमधील विखेविरोधी कोल्हे गटाला बरोबर घेतले तो याच प्रयत्नाचा एक भाग आहे. याचे परिणाम देखील गणेश कारखान्यात विजयाच्या रूपात दिसले.
काँग्रेसला नवसंजीवनी
भाजपमधील काही लोक सध्या विखे गटाच्या विरोधात आहेत. उदा. आ. राम शिंदे, जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे आदी. आता राम शिंदे- विवेक कोल्हे- आमदार नीलेश लंके यांची जवळीक वाढत आहे. त्यातच आ. थोरातही आक्रमकपणा वाढवत आहेत. यामुळे काँग्रेसला फायदा होईल. सध्या जिल्ह्यात अस्तित्वहीन बनलेल्या जिल्हा काँग्रेस संघटनेत नवचैतन्य येईल. काँग्रेसला सक्रियता निर्माण होण्यास त्याने मदत होईल असे म्हटले जात आहे.