बातमी कामाची ! विनापरवाना तुमच्या अंगणातील झाड तोडले तर 50 हजाराचा दंड भरावा लागणार, झाड तोडण्यासाठी कुठून घ्याल परवानगी ? वाचा…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात ग्लोबल वॉर्मिंगमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंग होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये वृक्षतोड हे एक प्रमुख कारण आहे. वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत असून ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे. पर्यावरणातील असमतोलामुळे जगाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यामुळे अवेळी पाऊस पडतोय. पावसाळ्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. कमी कालावधीत अधिक पाऊस पडू लागला आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हेच कारण आहे की, आता कार्बन उत्सर्जित करणाऱ्या वाहनांच्या वापरांवर सरकारने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिक प्रोत्साहित केले जात आहे.

यासोबतच वृक्ष लागवडीसाठी देखील नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. शिवाय वृक्षतोड करण्याला देखील शासनाने बंदी घातली आहे. तसेच जे लोक वृक्षतोड करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनाच्या माध्यमातून केली जात आहे. जर तुम्ही तुमच्या अंगणातील झाड जरी तोडले तरी देखील तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

तुमच्या मालकीच्या जागेतील किंवा इतर ठिकाणातील झाड तुम्ही विनापरवानगी तोडले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या अंगणातील किंवा इतर ठिकाणी असलेले झाड तोडायचे असेल तर तुम्हाला यासाठी कार्यरत असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतल्यानंतरच कोणतेही झाड तोडता येते.

जर विनापरवानगी झाड तोडले गेले तर झाड तोडणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो आणि दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते. जर एखादे झाड तोडायचे असेल किंवा झाडाची फांदी तोडायची असेल तर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी समितीकडे अर्ज करावा लागतो. मग समिती एक बैठक घेते आणि या बैठकीत परवानगी द्यायची की नाही करायची यावर निर्णय होतो.

ज्या लोकांना परवानगी मिळते ते झाड तोडू शकतात मात्र ज्यांना परवानगी मिळत नाही त्यांना झाड कोणत्याही परिस्थितीत तोडता येऊ शकत नाही. जर विनापरवानगी झाड तोडले गेले तर सात वर्षांपेक्षा अधिक वयाच्या झाडासाठी 50 हजारापर्यंतचा दंड आकारला जातो. यासाठी रीतसर पंचनामा केला जातो आणि सदर व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होते तर काही प्रकरणांमध्ये गुन्हाही दाखल होतो.

कोणत्या कारणांसाठी मिळते वृक्षतोडीस परवानगी

शासकीय कामकाजासाठी झाड तोडण्यास परवानगी मिळते. रस्ते, इमारती बांधताना जर झाडांचा अडसर येत असेल तर झाड तोडण्याची परवानगी मिळू शकते. तसेच जर एखादे झाड जीर्ण झालेले असेल आणि त्यापासून धोका निर्माण झाला असेल, विद्युत तारांना अथवा वाहतुकीसाठी झाड अडथळा ठरत असेल तरी सुद्धा झाड तोडण्याची परवानगी मिळू शकते.

पण झाड तोडण्याची परवानगी मिळाल्यानंतर आणि झाड तोडल्यानंतर त्याबदल्यात वृक्षरोपण करावे लागते. तसेच जे झाड 50 वर्षांपेक्षा अधिक वयाची आहेत म्हणजेच प्राचीन वृक्ष आहेत अशा झाडांना कोणत्याही परिस्थितीत तोडण्यासाठी परवानगी मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe