Chichondi Patil : ग्रामसभेतील वाद विकोपाला ! एकमेकाच्या जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे गावातील विकासकामांवर विपरीत

Ahmednagarlive24 office
Published:

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामसभेत झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आजपर्यंत आमच्या ग्रामसभेमध्ये कधीही भांडण झालेले नसताना या प्रकरारामुळे गावाची पोलीस स्टेशनला झालेल्या ग्रामसभेच्या परस्परविरोधी तक्रारीमुळे बदनामी होते आहे.

आजवर गावात कधीही वाद झाले नाही मात्र आता वाद होवून या वादामुळे गावाच्या विकाकामांवर विपरीत परिणाम होत आहे. तरी आपण याबाबत सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, असा अर्ज दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी तालुका पोलिसांना दिला आहे.

या अर्जात नमूद केले आहे की, दि.८ डिसेंबर रोजी चिचोंडी पाटील येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेमध्ये नेहमीचे विषय होत असताना कुठेही गोंधळ गडबड झाली नाही. मात्र ऐन वेळच्या विषयांदरम्यान सरपंच शरद खंडू पवार यांना कोणाचा तरी मोबाईल वरती फोन आल्यामुळे ते मोबाईलवर बोलू लागले. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने माईकवर बोलण्यासाठी सुधीर भद्रे यांना खुणावले.

सुधीर भद्रे यांनी त्या व्यक्तीला माइकवर बोलण्याची संधी मिळावी म्हणुन सरपंचांच्या हातातील माईक घेऊन, त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सरपंचांना अपमान वाटला व त्यांनी भद्रे यांच्याशी मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केल्याने भद्रे ही प्रत्युत्तर देऊ लागले.

यावेळी सरपंच पवार यांचा वाहन चालक सूरज किशोर भोज हा ग्रामसभेत बोलल्याने वाद वाढला. हा वाहनचालक चिचोंडीचा रहीवाशी नसल्याने ‘भद्रे यांच्या गटातील ग्रामस्थ आक्रमक झाले. मात्र हा वाद तेथेच मिटला होता. परंतु नंतर दोन दिवसांनी एका मेडीकल जवळ परत दोन्ही गटात वाद झाल्याने एकमेकांविरूध्द फिर्यादी दाखल केल्या.

मी ग्रामसभेला हजर होतो. माझे प्रश्न मी लिखित स्वरूपात मांडले. आमच्या गावची ग्रामसभेची सूचना सात दिवस अगोदर दिली जात नाही तर ऐनवेळेला दिली जाते. शासन नियमाप्रमाणे सात दिवस आधी सर्व ग्रामस्थांना गावात असलेल्या सर्व सदस्यांवर ग्रामसभेची सूचना देण्याची मी लेखी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या सर्व खात्यांची माहिती मी गेल्या ग्रामसभेमध्ये मागितली होती.

ती अद्याप साडेतीन महिन्यानंतरही मला मिळाली नसल्यामुळे मला ती द्यावी असा अर्ज मी लेखी स्वरूपात दिलेला आहे. ग्रामसभेमध्ये मी काहीही बोललेलो नाही तसेच या वादामध्ये माझा अजिबात सहभाग नव्हता. तरी सुद्धा तक्रार अर्जामध्ये माझे नाव टाकलेले आहे. तरी आपण या प्रकरणात वेळीच गंभीर दखल घेवून सखोल तपास करावा व संबंधितांवर कारवाई करावी. व गावाची होत असलेली बदनामी थांबवावी अशी मागणी दिलीप कोकाटे यांनी केली आहे.

आजपर्यंत चिंचोडीच्या ग्रामसभेमध्ये येवढा गोंधळ कधीही झालेला नाही, मात्र बाहेरगावच्या या दोन लोकांमुळेच वाद झालेला आहे. पोलीस स्टेशनला झालेल्या ग्रामसभेच्या परस्परविरोची तक्रारीमुळे गावाची बदनामी होत आहे. तसेच एकमेकाच्या जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे गावातील विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe