अहमदनगर : कशी काळरात्र आली..! या गावात एकाच वेळी पेटल्या चार चिता, भयाण घटनेनं सार गाव शोकाकुल..

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. अशीच काळरात्र ‘त्या’ चौघांवर आली. धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात झाला व त्यात अकोलेतील एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौघांचा जीव गेला.

सोमवारी अकोलेतील प्रवरानदी काठावर अमरधाम येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. अकोलेकरांनी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त केला. सारे गाव यावेळी हळहळले होते. सर्वांच्याच डोळ्यात आश्रू दाटले होते.

संपूर्ण अकोले शहरच निःशब्द झाले होते. पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावच्या शिवारात रविवारी रात्री अपघात झाला होता. यात ओजस्वी धारणकर (वय २ वर्षे), तिची आजी आशा सुनील धारणकर (वय ४२),

आजोबा सुनील धारणकर (वय ६५) व शहरातील हरहुन्नरी उमदे व्यक्तीमत्व, अष्टपैलू खेळाडू अभय सुरेश विसाळ (वय ४८) हे मृत पावले होते.

अशी झाली होती गावातील परिस्थिती

पंचवीस हजार लोकसंख्येच्या अकोले शहरात सोमवारी सगळीकडे शोक दिसत होता. मृत अभय विसाळ यांचे अकोले शहरात कचोरी-भेळीचे प्रसिद्ध दुकान आहे. त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रसिद्ध होते. तसेच ते अष्टपैलू खेळाडू असल्याने संपूर्ण तालुक्यात तो परिचित होता.

तर धारणकर यांची पूर्वी खानावळ होती. आता त्यांचा ड्रेस ड्रेपरीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचाही संपर्क दांडगा होता. या सर्वच घटनेने अकोलकर हळहळले होते. आमदार डॉ. किरण लहामटे याना ही माहिती समजताच त्यांनी नागपूर येथून शोक व्यक्त केला. तसेच जखमींना वैद्यकीय मदत व उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देऊ असेही सांगितले.

 चंदनपुरी घाटात झाला होता अपघात

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावच्या शिवारात धावत्या कारवर ट्रक उलटला होता. यात चौघांचा मृत्यू झाला होता. त्यात एक महिला जखमी झाली. मयतांमध्ये दोन वर्षाची मुलगी, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण अकोले (जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. हा अपघात रविवारी (दि. १७) संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला होता.