गेली काही दिवसापासून दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला असून याच बरोबर चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे.
शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० रुपयांचा भाव मिळावा असा अध्यादेश काढावा या मागणीसाठी भाजपाचे अशोक खेडकर यांच्यासह तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर दि १८ डिसे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने दूध उत्पादक सहभागी झाले आहेत.
मागील दीड महिन्यापासून १० रुपयांनी दुधाचे दर कमी झाले आहे. खाजगी दूध संकलन करणारे प्रकल्प यांनी एकत्रित संघटन करून सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांकडून २५ रुपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर शासनाने त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी.
तसेच दुधाला प्रति लिटर ४० रुपये प्रमाणे दर मिळावा असा अध्यादेश काढून तो खाजगी दूध प्रकल्प आणि सहकारी दुग्ध संस्थाना बंधनकारक करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सद्या तालुक्यात चारा टंचाई सहश्य परिस्थिती उदभावली असून पशुपालक जनावरांच्या संगोपनासाठी मेटाकुटीला आला आहे. यासह दिवसादिवस पशुखाद्य, त्यांना करण्यात येणारा औषधोपचार याचे दर गगनाला भिडले आहेत.
प्रत्यक्ष दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्यास मिळणारा भाव यामध्ये तफावत पडत असून शेतकरी राजा दुग्ध व्यवसाय तोट्यात करीत आहे. यामुळे दुग्ध उत्पादकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून सर्वसामान्यांचे गा-हाणे मांडणे हे प्रत्येक लोक सेवकांचे काम आहे
म्हणून भाजपचे नेते अशोक खेडकर यांनी सत्तेचा विचार न करता शासनाला या प्रश्नाची धाहकता समजावी म्हणून थेट आंदोलनाचे हत्यार उपसले असून याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात सुनील शेलार, नारायण जगताप, रघुआवा काळदाते, संजय तोरडमल, रावसाहेब खराडे, संदीप शेगडे, काकासाहेब धांडे आदींनी आंदोलनकत्यांनी पशुपालक आणि दूध उत्पादकांना येणाऱ्या अडचणी प्रशासना समोर मांडत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकिर, संचालक मंगेश पाटील, सरपंच शरद यादव, राजेंद्र तोरडमल, दादासाहेब खराडे, नवनाथ लष्कर, रामजी पाटील, बाळासाहेब सपकाळ,
लालासाहेब सुद्रिक, बाळासाहेव निंबाळकर, रघुनाथ ढेरे, सर्जेराव कवडे, दीपक काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी सहभागी झाले असून कर्जत तहसील कार्यालया पुढे आमरण उपोषणास बसले होते.
दुपारी प्रांताधीकारी नितीन पाटील यांनी आंदोलक अशोकराव खेडकर व दूध उत्पादकांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन आपल्या मागणी च्या अनुषंगाने दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज विधान सभेत निवेदन करून
अधिवेशन संपण्या अगोदर दूध दरसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे जाहीर केले असल्याची माहिती खा. डॉ सुजय विखे व आ. प्रा. राम शिंदे यांनी दूरध्वनी द्वारे दिली असल्याचे पत्र आंदोलकांना दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.