Nilesh Lanke : पारनेर-नगर मतदारसंघातील निमगाव वाघा, ता. नगर येथे खास बाब म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना दिली.
यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निमगाव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते.
या गावामध्ये मोठया प्रमाणावर पशुधन असून, तिथे पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय नसल्याने आजारी जनावरांवर उपचार करण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहेत.
निमगाव वाघा व परिसर हा जिरायत भाग असून, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायावरच सर्व भिस्त आहे. दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणावर करण्यात येत असल्याने या भागात जनावरांवरील उपचारासाठी पुशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत आवश्यता आहे.
अलिकडेच झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. शेतीपुरक असलेल्या दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे हे दुग्धव्यवसायातूनच येतात. या सर्व बाबींचा विार करून खास बाब म्हणून निमगांव वाघा येथे तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आ. लंके यांनी अजितदादा पवार यांच्याकडे केली.
जिरायत भागातील शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय असल्याने आ. लंके यांनी मांडलेला प्रस्ताव योग्य असल्याचे पवार यांनी सांगत प्रस्ताव प्राप्त होताच या दवाखान्यासाठी मी खास म्हणून मंजूरी देऊन निधीही देऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
आ. लंके यांनी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना दालनात बोलवून घेत निमगाव वाघा, ता. नगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रस्ताव तयार करून तो आपणाकडे सादर करण्याचे आदेश दिले. मुंडे यांनीही सबंधितांना प्रस्तावाबाबत सुचना देण्याचे मान्य केले.