Ahmednagar News : स्विफ्ट कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात नगर – कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोर घडला.
महेश तुकाराम काठमोरे, रा. शिरपूर, ता. पाथर्डी, असे अपघातातील मयताचे नाव असून, वाहनचालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी हे गंभीर जखमी झाले आहेत. मयत काठमोरे हे नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने पारनेरचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथे दाखल केले.
तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गणेश आणि साहील यांना पुढील उपचाराकामी अहमदनगर येथे पाठविण्यात आले. कारचालक साहील करीम हुसेन खान हा मयत पोलीस शिपाई महेश काटमोरे यांना स्वीफ्ट कार (नंबर एम एच१४ जी एस ४२२०) ने सोडण्यासाठी जात होता.
रात्री ११.३० वा. च्या सुमारास पारनेर तालुक्यातील ढोकी गावच्या शिवारात चालक साहील खान याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडच्या खाली असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला.
यबाबत मयताचा भाऊ गणेश तुकाराम काठमोरे (वय ३६) वर्षे, रा. शिरापूर, ता. पाथर्डी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून साहील करीम हुसेन खान याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.