Ahmednagar News : महसूलमंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी ! पारनेरात १ कोटींची वाळूचोरी, धक्कादायक घडामोडी समोर

Published on -

अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करीचा शापच लागलेला आहे. वाळूतस्करांच्या विविध घटना समोर येत असतानाच आता एक धक्कादायक वृत्त आले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मुळा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या खासगी मालकीच्या जागेतून १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात आहे.

याचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने केला असून कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार ५ जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे या तालुक्यात खास लक्ष आहे. परंतु याच तालुक्यात मोठी वाळूचोरी झाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडवे खुर्द येथील विमल रामचंद्र गागरे यांच्या शेत जमिनीतील गट क्रमांक ६१७ मधून तब्बल १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. बाजारभावा प्रमाणे या वाळूची किंमत तब्बल १ कोटी १ लाख १६ हजार ६०० रूपये होते.

दरम्यान पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी या वाळू चोरीचे सोशल मीडियावर आलेल्या फुटेज नुसार संबंधित तलाठी दत्तात्रय शिंदे यांना गुन्हा नोंदवण्यासाठी सांगितले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

पळशीचे मंडल अधिकारी अशोक डोळस यांच्यासह महसूल विभागाचे पथक हे मुळा नदी परिसरात शिवार पाहणी करत होते. यावेळी सदर जागेवर वाळू उपसा केला जात असल्याचा खुणा त्यांना आढळून आल्या. यासंबंधी माहिती तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना देताच तहसीलदार सौंदाणे यांच्या आदेशानुसार पळशीचे मंडलाधिकारी अशोक डोळस, कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे, कामगार तलाठी निलेश पवार, कामगार तलाठी रविंद्र शिरसाट, कामगार तलाठी शरदचंद्र नांगरे यांना या अवैध वाळू उपसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe