देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे सर्व आमचे, खासदार मी आणि आमदार मोनिका राजळे आमच्या सोबत मग रस्त्याची मंजुरी तुम्हाला कशी मिळेल ?
महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये. आमदार मोनिकाताई राजळे यांनी महायुतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघाच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी आणला असून, हेच त्यांचे विरोधकांना उत्तर असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.
टाकळीमानूर येथे ग्रामविकास विभागांतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ मधून ७ कोटी ७१ लक्ष रुपये खर्चाच्या करोडी ते टाकळीमानूर, या आठ किमी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार मोनिकाताई राजळे व खा. सुजय विखे यांच्या हस्ते झाला. या वेळी खा. विखे बोलत होते.
या वेळी बोलताना विखे म्हणाले, विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत, हे बरे नाही. आम्ही विकास कामे करून जनतेसमोर जात आहोत. विकासाला निधी आणण्यात राजळे खुप पुढे आहेत.
विरोधकांची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारीला आयोध्येत राम मंदिरात जो उत्सव होत आहे. त्यावेळी आपले लाडू प्रसाद म्हणून आयोध्येला गेले पाहिजेत.
त्यासाठी साखर व दाळ वाटप करीत आहोत. हे सरकारी पैशातून नाही तर स्वतःच्या घरातून खर्च करून राजळे व आम्ही करीत आहोत. आम्ही जनतेची कामे केली म्हणून तर जनता आमच्या सोबत असते.
या वेळी आ. राजळे म्हणाल्या, नगर जिल्ह्यात गाजलेला हा करोडी-टाकळीमानूर रस्ता आहे. पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी तालुक्याला निधी दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले.
तालुक्यात एक किलोमीटर तरी रस्त्याचे काम केले का? टीका करणे सोपे असते. मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतुन निधी दिला आहे. पालकमंत्री विखे यांनी निधी दिला आहे. सध्या दोन्ही तालुक्यांत मिळून ५० किलोमीटरचे रस्ते सुरु आहेत.
भगवान गड पाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. काही तांत्रीक अडचणी आहेत, त्या सोडविल्या जातील. विरोधक टीका करीत असतात. त्यांना विकासाच्या कामातून उत्तर देऊ. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून निधी मिळविण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी काम केलेले आहे.
त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. शुभम गाडे यांनी स्वागत केले. विजय जोशी यांनी प्रास्ताविक केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब गाडे यानी आभार मानले.