डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु आहे. थोड्याच दिवसात हे वर्ष सरेल व नवीन वर्षात आपण प्रदार्पण करू. अनेक लोक या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनिंग करतात.
यामध्ये भंडारदऱ्याला फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. जर तुम्हीही नववर्षाच्या स्वागताला भंडारदऱ्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच. गर्दीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस व वन विभाग यांनी एकत्रितपणे नियम केले आहेत. ते आधी समजावून घ्या.
व्यावसायिकांसाठी सूचना :- पोलिसांनी पर्यटकांसाठी नियम केले आहेतच सोबत तेथील व्यावसायिकांवरही अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पर्यटकांना रास्त मोबदल्यात सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनेही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना दिल्यात. ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन तंबूत राहणाऱ्या शौकिनांची संख्या जास्त असते.
तेथील जंगलात भटकंती करायची व रात्री तंबूत मुक्काम करण्यास यायचे याकडे पर्यटकांचा कल असतो. त्यामुळे पर्यटकांकडून आवास्तव पैसे न घेण्याच्या सूचनेबरोबर तंबूत मुक्कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवावी, त्यांचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक नोंदवून घ्यावेत अशा सूचना व्यावसायिकांना दिल्यात. असे न केल्यास तंबूचा व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
पर्यटकांसाठी नियम :- पर्यटकांसाठी विविध नियम पोलिसांनी केले आहेत. जंगलात फिरणाऱ्यांना रात्री जंगलात फिरता येणार नसून रात्री अकरा नंतर तंबूत कोणत्याही प्रकारचे संगीत वाजविता येणार नसल्याच्या सूचना आहेत.
पोलिसांकडून वारंघुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजूर येथे पर्यटकांसाठी तपासणी नाके उभारण्यात येणार असून मद्य व अंमली पदार्थ यावेळी कोणाकडे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांवरही चाप बसणार आहे. निसर्गातील शांतता भंग होऊन वन्य प्राण्यांनाही अनेकांकडून झळ पोहचत असते तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते त्यामुळे यासाठी पोलिसांतर्फे विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पर्यटकांनी आनंद लुटण्यासाठी या भागात यावे, स्वत:सह इतरांच्याही आनंदाची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.