Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ येऊ राहिली आहे तसतसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्यातरी कुणालाच खात्रीशील सांगता येत नाहीय.
दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळावा होणार आहे. आणि आता त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड अहमदनगर जिल्ह्यात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय होऊ शकते?
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील माजी आ. भानुदास मुरकुटे हे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याचे सांगितले जात आहे. ते काही महिन्रांपूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेले होते पण आता ते राष्ट्रवादीत येणार असून शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता सध्या वर्तवली आहे.
मुरकुटेंची मनधरणी
माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृहात झाला. या मेळाव्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व अॅड. वर्पे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या ‘जिद्द’ निवासस्थानी जाऊन,
चर्चा करुन ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या पक्षासोबत आपण काम करावे, असा निरोप दिला असे सांगितले जात आहे. मुरकुटे यांनी देखील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय कळवितो असे सांगितल्याचे समजते. पण ही बैठक होताच माजी आ. मुरकुटे यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब मुळे, गणेश भाकरे, गणेश छल्लारे आदी या मेळाव्यास आले. त्यामुळे आता राजकीय तर्क वितर्काला उधाण आले आहे.
गेमचेंजर नेता
माजी आ.मुरकुटे यांची गेमचेंजर नेता म्हणून ओळख आहे. त्याची लोकसेवा विकास आघाडीद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. करण ससाणे यांना हाताशी घेत अशोक साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुका जिंकून राजकीय वर्चस्व स्थापन केले.
आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे समजते. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी या प्रवेशास विरोध केला असून ‘लोकसेवा आघाडी’ चे संघटन कायम ठेवावे व सोयीनुसार राजकीय पक्षास पाठिंबा द्यावा असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे आता माजी आ. मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.