Tiger Deaths : विजेच्या धक्क्यापासून वाघांना वाचवणार ‘लक्ष्मणरेषा’ ! सरकार करणार प्रयोग

Ahmednagarlive24 office
Published:

Tiger Deaths :  राज्यात डुक्कर किंवा अन्य प्राण्यांसाठी लावण्यात येणाऱ्या विद्युत तारेच्या कुंपणात अडकून वाघांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्य सरकार त्यामुळे वाघांना वाचवणे आणि त्यांच्या

मृत्यूचे प्रमाण करण्यासाठी लक्ष्मणरेषेचा प्रयोग राबवणार आहे. याकरिता वनविभागाने राजस्थानच्या धर्तीवर थर्मल तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्यात वाघांची संख्या जवळपास ४४४ इतकी आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक २३० वाघ आहेत. वन्यप्राण्यांचे जंगलात ८० टक्के मृत्यू होतात. अशातच वन्य डुक्कर आणि इतर प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्याचे प्रकार सर्रास आढळतात.

जंगली प्राणी अथवा अन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण होते, मात्र, विद्युत प्रवाहामुळे अनेक वाघ मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी, सरकारने पावले टाकायला सुरुवात केली असून राजस्थानच्या धर्तीवर सेन्सर असलेले विद्युत तंत्रज्ञान विकसित करणार आहे.

वाघांच्या मृत्यूला रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त थर्मल तंत्रज्ञान वापरत असून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात प्रायोगिक तत्त्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. चार महिने याची चाचणी केली जाईल, या तंत्राच्या वापराचा अहवाल पाहिल्यानंतर, तो इतर ठिकाणी वापरला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले,

असे आहे तंत्रज्ञान

ग्रामीण भागात वाघाच्या रिझर्व्हच्या बाहेर एक अदृश्य सेन्सर बसविला जाईल. लक्ष्मण रेषा असे याला नाव देण्यात आले आहे, वाघ ज्या सेन्सरमधून बाहेर पडत आहे, त्या बाजूची माहिती संबंधित वन अधिकाऱ्यांना मिळेल,

एसएमएसद्वारे किंवा मोबाइल फोनद्वारे याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल, जेणेकरून वाघ विजेच्या धक्क्यांपासून बसण्यापासून वाचतील, तसेच वाघाने ही ‘लक्ष्मणरेखा’ ओलांडताच अलार्म वाजणे सुरू होईल. दीड किलोमीटरच्या परिघात हे सेन्सर काम करेल. सध्या हे तंत्रज्ञान राजस्थानमध्येही वापरले जात आहे.

वाघाचा मृत्यू

महाराष्ट्रातील सुमारे २० टक्के वाघ विजेच्या धक्क्याने मरण पावले आहेत. २०१६ मध्ये १६, २०१७ मध्ये २२, २०१८ मध्ये १९, २०१९ मध्ये १७, २०२० मध्ये १८, २०२१ मध्ये ३२, २०२२ मध्ये २९ आणि २०२३ ऑक्टोबरपर्यंत ४२ वाघ मृत्युमुखी पडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe