Ahmednagar News : अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क नेहमीच कारवाया करत असते. या दारूमुळे अनेकांचे बळी गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ही दारूविक्री होऊ नये यासाठी पोलीस नेहमीच सजग असतात.
अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील आठ महिन्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत. तब्बल एक हजार ६२१ दारू अड्ड्यांवर छापेमारी करून दोन कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच दीड हजाराहून अधिक आरोपींना अटक केलीये. बऱ्याचवेळा राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील दारू येथे विक्रीला येते. बनावट दारूची निर्मितीही केली जाते.
यामुळे राज्य सरकारचा महसूल तर बुडतोच परंतु मद्यपान करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. महाराष्ट्र दारूबंदी नियम १९४९चा कायदा या सराईतांवर वचक ठेवतो.
येथे करा तक्रार
जर तुमच्याही गावात कोणी अवैध दारू विक्री करीत असेल तर ग्रामसभेत ठराव करून पोलिस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करता येते. तसेच एक टोल फ्री क्रमांक देखील आहे त्यावर तक्रार करता येईल.
आपल्या परिसरात आजूबाजूला विना परवाना अवैध दारू विक्री होत असेल तर १८००८३३३३३३ या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तक्रार देऊ शकता. हा टोल फ्री क्रमांक आहे.
तीनपेक्षा जास्त गुन्हे असेल तर तडीपारीची तरतूद
अवैध दारूविक्री, वाहतूक यात तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले तर तडीपारीची कारवाई प्रशासन करू शकते. अशा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपारीची तरतूद आहे.
आता नजर थर्टी फर्स्टवर
आता डिसेंबर संपेल व नववर्ष सुरु होईल. याकाळात अवैध दारू धंद्याला जोर येतो. यावर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात पथक तैनात करण्यात आले आहे. यात एक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक व सात पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.