दिवसेंदिवस अपघातांची वाढत चाललेली संख्या ही चिंताजनक आहे. नुकतेच संगमनेर मध्ये झालेल्या अपघातात अकोले येथील चौघे ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यात कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक ठार तर दोन जखमी झाले आहेत.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पठार भागातील माऊली येथील एकल घाटात हा अपघात झाला. रतनबाई गवळी असे मृत महिलेचे नाव आहे. सुरेखा बर्डे, देवगन गायकवाड असे जखमींचे नाव आहे. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.
अधिक माहिती अशी : पवार मळा (अकलापूर) येथील देवगन गायकवाड हे रतनबाई ज्ञानेश्वर गवळी व सुरेखा बर्डे दुचाकीवरून संगमनेरहून अकलापूरला जात होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पठार भागातील माऊली येथील एकल घाटात कार चालकाचे (एम.एच १२ आर.एफ ५५८४) नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीला पाठीमागून जाऊन आदळली.
यामुळे दुचाकीला जोराची धडक बसली. दुचाकी महामार्गालगतच्या साईड गटारीत पडली. यात दुचाकीवरील रतनबाई गवळी यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा व देवगन गायकवाड हे जखमी झाले होते. घटनेची माहिती समजताच नागरिक व डोळासणे महामार्ग पोलिस केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले होते.