खरेदी-विक्री संघ हा देखील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा. खरेदी-विक्री संघावर आपलाच झेंडा फडकावा यासाठी पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यात रस्सीखेच दिसेल. दरम्यान पाथर्डीत तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची करून एकदिलाने कामाला लागावे असे आदेश आ. मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याशी विचार विनिमय करून उमेदवारांची यादी निश्चित करू हे सांगण्यास देखील त्या विसरल्या नाहीत. म्हणजेच काय तर खरेदी-विक्री संघावर राजळेंचा ‘वॉच’ ठेव्याचा आहे पण ‘कर्डीले-विखे’ पॅटर्नशिवाय हे शक्य नाही असेच सध्या दिसतेय.
काय म्हणाल्या आ. मोनिका राजळे?
राजळे यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजित कार्यकत्यांच्या मेळाव्यात आ. मोनिका राजळे मार्गदर्शन करत होत्या. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकांच्या अनुशंघाने यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार राजळे यांनी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले. येत्या २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
आ. राजळे म्हणाल्या, कोणत्याही निवडणुकीकडे सहजतेने बघू नये व विरोधकांना कमी लेखू नये. सहकारातील संस्था कुणा एका व्यक्तीच्या मालकीच्या नसतात, सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रमुख संस्था म्हणून तालुका खरेदी विक्री संघाला महत्त्व आहे. विकासाची कामधेनू म्हणून संस्थेचे लौकिक आहे. उमेदवारीबाबत निर्णय घेताना सर्वच इच्छुकांना सामावणे शक्य नाही. लगेच कुणी नाराज होऊ नका. पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, त्यातही संधी आहे असे त्या म्हणाल्या.
दक्षिणेत ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक
सध्या अहमदनगर लोकसभा मतदार संघात अर्थात दक्षिणेत ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक वाढताना दिसत आहे. दोघांची सहमती एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत त्यांना अध्यक्षपद देऊन मंत्री विखेंनी त्यांना आपल्यासोबत कायमचे ‘फिक्स’ केल्याची चर्चा आहे. माजी आ. शिवाजी कर्डीले देखील खा. सुजय विखे यांच्या सोबतीने अनेक राजकीय, सामाजिक कामे करताना दिसत आहेत. दरम्यान दक्षिणेमधील राजकारणात ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक सध्या पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.