साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो ! आमदार तनपुरे यांच्या समोरच टाहो…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली, त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले. मात्र आता आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटवून घ्या. अशा नोटीस आल्याने आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नाही.

साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो, आम्हाला मदत करा. अशा शब्दात तिसगाव मधील शायरा शेख, कल्पना साळवे, लता खंडागळे, वंदना खंडागळे, कीर्ती इंगवले यांच्यासह उपस्थित अनेक महिला भगिनींनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समोरच टाहो फोडला.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले असून, यासंदर्भात १५० दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे ही आदेश प्रशासनाला दिले आहेत.

आणि या संपूर्ण प्रक्रियेला आता अवघे १८ दिवस शिल्लक राहिले आहेत, म्हणून यातून काहीतरी मार्ग काढावा. यासाठी बुधवारी आमदार तनपुरे तिसगाव ग्रामपंचायत कार्यालयात या अतिक्रमणधारकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आले होते.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, सरपंच इलियास शेख, चेअरमन बाळासाहेब लवांडे, उपसरपंच अमोल गारुडकर, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, धारवाडीचे सरपंच भीमराज सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर,

बिस्मिल्ला इनामदार, शबाना शेख, डॉक्टर नरवडे, माजी सरपंच काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब वाघ, अॅड. अय्याज शेख, पापाभाई तांबोळी, सतीश साळवे, हरिभाऊ साळवे यांच्यासह सर्व अतिक्रमणधारक यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार तनपुरे यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी व अतिक्रमणधारकांच्या सर्व भावना जाणून घेत म्हणाले, या प्रकरणासंदर्भात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करता येईल का यासाठी प्रथमतः प्रयत्न करू.

त्याचबरोबर अभ्यासू वकिलामार्फत वरच्या कोर्टात या संदर्भात चर्चा करून त्यासाठी दिल्या जाणाऱ्या वकिलांची फी मी स्वतः देईल. गटनंबर २९६ मधील लोकांना अडचणीतून बाहेर काढावे

अशी विनंती यावेळी चेअरमन बाळासाहेब लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच अमोल गारुडकर, शिवसेना नेते अनिल रांधवणे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर या पदाधिकाऱ्यांनी आ. तनपुरे यांच्याकडे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe