Ahmednagar News : आतापर्यंत चोरटे किमती वस्तू सोने चांदी आदी साहित्य चोरून नेत होते. मात्र अलीकडच्या काळात चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या दैनंदिन लागणारे अवजारे, जनावरे इतकेच नव्हे तर शेतातील फळे, शेतमालच चोरी करण्याकडे वळवला आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांसह पोलिसांना देखील या चोरट्यांचा बंदोबस्त करणे कठीण झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील कोथूळ चौकात राहणाऱ्या देविदास लगड यांच्या घरासमोर वाळत घातलेली सुमारे ८४ हजार रुपये किमतीची पांढरी तूर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात ऋषीकेश लगड यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या शेतातील नुकतीच काढलेली पांढरी तूर वाळविण्यासाठी घराच्या समोर पसरवून ठेवली होती.
दि.२८ डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लगड यांच्या घराला बाहेरून कडी लावत सुमारे ८४ हजार रुपये किमतीची सुमारे १२ क्विंटल पांढरी तूर अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली. या प्रकरणी अधिक तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.