Ahmednagar Crime News : तडीपार आरोपींचा धिंगाणा ! तरुणाच्या डोक्यात फोडल्या दारूच्या बाटल्या

Ahmednagarlive24 office
Published:

दरोडा, मारहाण आदी गुन्ह्यातील तडीपार झालेल्या टोळीचा राहुरी परिसरात उच्छाद सुरूच आहे. जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई होऊनही राहुरी परिसरातच ठाण मांडणाऱ्या टोळीतील पाच ते सहा आरोपींनी एका तरुणाच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरात दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी घडली.

याबाबत सूत्रांनी दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आकाश बाळासाहेब थोरात (वय २५ वर्षे, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हा तरुण राहुरी शहरातील जुन्या कोर्टाजबळ त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेसाठी थांबला होता.

तेव्हा तेथे रोडच्या बाजुला उभ्या असलेल्या आरोपींनी काही एक कारण नसताना आकाश थोरात याला लाथा- बुक्‍क्यांनी मारहान केली, तसेच बियरची बाटली डोक्यात मारुन जखमी केले.

आकाश थोरात याच्या मोटारसायकलवर दगड मारुन मोटारसायकलचे नुकसान केले. तु जर आम्हाला परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. जखमी झालेल्या आकाश थोरात याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सनी गोरख मेहत्रे व भारत भाऊसाहेब ढोकणे (दोघे रा. राहुरी) व दोन अनोळखी तरुण अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. १४४७/२०२३ नुसार भा.दंवि. कलम ३२४, ३२३, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी परिसरात वाढलेली गुन्हेगारी व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्‍त होत आहे. जिल्ह्यातून काही महिन्यापूर्वी एका टोळीला १८ महिन्यांसाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशान्वये तडीपार केले होते.

संबंधित टोळीचा परिसरात वावर असल्याची चर्चा होती. त्याच टोळीने शहरामध्ये मोठा उच्छाद घातल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातून तडीपार असूनही तालुक्‍यात वावरणाऱ्या टोळीला पोलिस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याची चर्चा आहे.

राहुरी ‘पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियते बाबत चांगलाच संताप व्यक्‍त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe