Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील विविध तीन महत्त्वाच्या रस्त्यासाठी ६.६२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, रस्त्यांच्या या कामासाठी यापूर्वी ४६० कोटी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे म्हणाले, चार वर्षात रखडलेल्या रस्ते विकासाला चालना देवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा मिटविण्यात आ. काळे यशस्वी झाले आहे. ज्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, अशा सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले असून त्यापैकी ६.६२ कोटीच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
यापुर्वी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या रस्त्याचा विकास रखडल्यामुळे त्याचा परिणाम दळणवळणावर होवून नागरिकांना येणाऱ्या अडचणी येत होत्या. या अडचणी कायमच्या सोडविण्यासाठी रस्ते विकासासाठी चार वर्षात ४६० कोटी निधी आणला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या रस्त्यांच्या अडचणी दूर होवून विकासाला चालना मिळाली आहे.