Ram Mandir Donation : राममंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागणारे रॅकेट सक्रिय

अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा तोंडावर आलेला असताना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आले आहे. हे भामटे सोशल मीडियावर संदेश पाठवून राम मंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागत असून विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आहे.

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रविवारी ट्विटरवर याबाबत माहिती देत लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या नावाने एक आयडी तयार करून राममंदिरासाठी देणगी मागणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या संदेशात एक क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून त्याद्वारे राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात ट्रस्टकडून अशी कोणतीही देणगी गोळा करण्यात येत नसल्याचे बन्सल यांनी सांगितले.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय, उत्तर प्रदेश सरकार आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती विहिंप प्रवक्त्यांनी दिली.

हा आनंदाचा क्षण आहे. आम्ही रामलल्लांच्या प्रतिष्ठापणेचे आमंत्रण देत आहोत. सध्या कोणतीही देणगी स्वीकारण्यात येत नसल्याचे विहिंपने सांगितले. तसेच फसवणूक होऊ नये, म्हणून लोकांनी सावध राहावे,

असे आवाहनही परिषदेतर्फे करण्यात आले आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर देखील अशाच प्रकारे भामट्यांकडून अवैधरीत्या देणग्या गोळा करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.