मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने अहमदनगर येथे सहभागी होतील. त्याकरिता आत्तापासूनच नियोजन सुरू केले जात असल्याची माहिती सकल मराठा समाज व अखंड मराठा समाज संयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे सुरू होणारे उपोषण त्याचबरोबर अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी पदयात्रेत सामील होण्यासाठी नियोजन बैठक नुकतीच श्रीरामपूर येथे पार पडली.
याप्रसंगी सकल मराठा समाज व अखंड मराठा समाज प्रतिनिधी सुरेश कांगुणे, नागेश सावंत, संजय गांगड, अॅड. अरुण लबडे, अण्णासाहेब डावखर, पंडितराव बोंबले, शरद नवले, अॅड. गणेश सिनारे, नितीन पटारे, विजय पटारे, अमोल जैत, आकाश मोरगे, योगेश जाधव, एकनाथ डांगे, संदीप ढगे, ज्ञानेश्वर रणदिवे, बाबासाहेब भणगे, अमोल पटारे, प्रशांत पटारे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आत्ताच्या व भावी पिढीच्या भवितव्यासाठी मराठा आरक्षण हेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता सर्व मराठा समाज बांधवांनी आजपर्यंत झालेल्या सभा, आंदोलन, मोर्चा आदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे आज राज्य सरकार निर्णय घेण्यापर्यंत पोहोचले आहे.
आता नाही तर परत कधीही नाही, अशी मराठा आरक्षणाची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातून व ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. त्याकरिता शहरात व ग्रामीण भागात जनजागृती करून बैठक घेऊन मराठा समाज बांधवांना सविस्तर माहिती व नियोजन देण्यात येणार आहे.
अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील यांच्या पायी पदयात्रेत श्रीरामपूरातील समाज बांधव अहमदनगर येथे सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पुढील बैठक घेऊन मुंबई येणाऱ्या बांधवांचे कशा पद्धतीने नियोजन असेल याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्याअगोदर मुंबईला येणाऱ्या समाज बांधवांची गावानुसार यादी केली जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
आजपर्यंत श्रीरामपूरात कॅण्डल मार्च, श्रीरामपूर बंद, जरांगे पाटील यांची सभा, उपोषण, साखळी उपोषण ज्या पद्धतीने झाले. त्या पद्धतीनेच मुंबई दौरा शांततेच्या व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.