Ahmednagar News : सुरवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने व नंतर झालेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांना मोठा तडाखा बसला. यामध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. सध्या शेतकऱ्यांना काही पिकांचा पीकविमा मिळाला होता. परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे.
शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मंजूर झाला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा साठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रिम रक्कम विमा कंपनी मार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ दादा कोरडे यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने १ रूपयात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती.
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली आहे.
पारनेर तालुका व संगमनेर तालुक्यातील निमोण महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप प्रलंबित असलेल्या सोयाबीन व मका पिकाच्या अग्रिम रकमेचे वाटप होणार असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले आहे.
या सर्व प्रकरणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते आदींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार मानले.