Ahmednagar Breaking : अहमदनगर मधून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. नुकतीच एका नगरसेवकाने बार चालकाला खंडणी मागितल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगर जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे यांच्यासह त्यांचे भाऊ संजय शंकर दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
अधिक माहिती अशी : जलसंधारण व मृद विभागाने ५ एप्रिल २०२३ रोजी पिंपळदरावाडी येथे लघुपाटबंधारे योजनेचे काम हुले कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. हे काम सुरु असताना २३ डिसेंबर २०२३ रोजी या कामावर काही लोक आलेले होते.
त्याचदिवशी सकाळी बाजीराव दराडे व संजय दराडे तेथे आले व त्यांनी कामाची पाहणी करत शिवीगाळ केली. साईट इन्चार्ज बारीकराव बावने यांनी कन्स्ट्रक्शनचे मालक विश्वनाथ हिले यांना फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर हे काम बंद केले.
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबरला बाजीराव दराडे याने कंपनीचे मालक विश्वनाथ हिले यांना फोनवर ५० लाखांची मागणी करत हे पैसे मिळाले नाही तर मशिनरी जाळून टाकू, कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडू, हे काम बंद ठेवण्यासाठी धमकावले असे फिर्यादीत म्हटले आहे.
हुले कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड बांधकाम कंपनीचे श्रीकांत दिगांबर कबडे (रा. पाटोदा, जि. बीड) अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपींनी सबंधित बांधकाम व्यावसायिकांस ५० लाख रुपये न दिल्यास,
बांधकामावरील मशिनरी जाळून नुकसान करू, कामगारांचे हातपाय तोडून कंपनीच्या टोलबूथची तोडफोड करू अशीही धमकी दिली होती.