Super Sonic Train : तब्बल १,००० किलोमीटर वेगाने धावणारी सुपर सॉनिक ट्रेन

Published on -

Super Sonic Train : भारतात ‘वंदे भारत’ आणि ‘अमृत ‘भारत’ सारख्या वेगवान ट्रेन सुरू झाल्या आहेत, पण आपला शेजारी देश चीन ताशी १,००० किलोमीटर वेगाने धावणारी सुपर सॉनिक ट्रेन तयार करत आहे.

विशेष म्हणजे चीनने या ट्रेनची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. एका लांब पाइपलाइनच्या आतून चालवल्या जाणाऱ्या या ट्रेनला ‘अल्ट्रा हाय स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन’ (मगलेव्ह) ट्रेन असे म्हटले जात आहे.

‘चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेड’ (सीएएसआयसी) ने या मॅग्लेव्ह ट्रेनची चाचणी शान्सी प्रांतात यशस्वीरीत्या पूर्ण केली. या ठिकाणी दोन किलोमीटर लांब पाइपलाइनच्या आत व्हॅक्यूम तयार करून ट्रेन चालवण्यात आली. भविष्यात हांगझोऊ आणि शांघाय या दोन मोठ्या शहरांदरम्यान ही ट्रेन सुरू करण्याची चीनची योजना आहे.

उत्तर चीनमधील शान्सी प्रांतातील दातोंग शहरात या ट्रेनसाठी सुपर कंडक्टिंग मॅग्लेव्ह चाचणी लाइन तयार करण्यात आली आहे. सीएएसआयसी शास्त्रज्ञ ली पिंग म्हणाले की, सध्या या ट्रेनच्या प्राथमिक चाचण्या करण्यात येत असून त्यात यशही मिळाले आहे.

सध्या ट्रेनची रचना, वेग, नेव्हिगेशन आदींची यशस्वी चाचणी झाली असून, एकदा ही ट्रेन सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतर हांगझोऊ आणि शांघायदरम्यान सुरू केली जाणार आहे. सध्या ६२३ किलोमीटर प्रतितास या वेगाने या ट्रेनची चाचणी करण्यात आली आहे.

व्हॅक्यूम निर्माण न करता ही गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे व्हॅक्यूम तयार केल्यानंतर तिचा वेग ताशी एक हजार किलोमीटर होईल. चीनमध्ये सद्यस्थितीत धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३५० किलोमीटर आहे.

दरम्यान, या ट्रेनसाठी खूप मेहनत, वेळ आणि पैसा लागणार असला तरी या ट्रेनमुळे प्रचंड वेगाने चीनच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अवघ्या काही तासांत प्रवास करता येऊ शकणार असल्याचेही ली पिंग यांनी नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News